पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाला लाखो मुंबईकर चाकरमानी कोकण रेल्वेने कोकणात दाखल होतात. यासाठी मध्यरेल्वेच्या सहकार्याने मेमू स्पेशल गाडी दिव्यावरून सोडण्यात येणार आहे. ही गाडी रत्नागिरीपर्यंत धावणार आहे. ही गाडी दिव्याऐवजी दादरवरून सोडावी, अशी मागणी कोकणवासी प्रवाशांनी केली आहे. यासाठी रेल्वेला पत्रही पाठवण्यात आले आहे. कोकण रेल्वेमार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या १५६ फेऱ्या जाहीर नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल्ल झाल्यामुळे मध्यरेल्वेने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
यानुसार २०२३ मधील गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. या आधी गणेशोत्सवात डेमू, तसेच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग चिपळूणपर्यंतच करण्यात आला होता. त्यापुढे मेमू स्पेशल गाड्या चालवल्या जात नव्हत्या. मात्र, येत्या सप्टेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे तसेच मध्यरेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमो स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रत्नागिरी स्थानकापर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी धावणार आहे. रेल्वेने यंदा गणेशोत्सवासाठी दिवा येथून चिपळूण तसेच रत्नागिरीसाठी मेमू स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
मात्र मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांचा विचार करता तसेच यापूर्वी अनेक वर्षे सुरू असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी कोरोना काळापासून दिव्यातूनच रत्नागिरीला येत असल्यामुळे पश्चिम उपनगरातील कोकणवासीय जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे खास गणेशोत्सवासाठी रत्नागिरीपर्यंत चालवण्यात येणारी मेमू स्पेशल गाडी दिव्याऐवजी दादरवरून रत्नागिरीपर्यंत चालवावी, अशी मागणी आहे. ही गाडी दिव्यावरून सोडल्यामुळे त्याचा उपयोग दादर आणि त्या परिसरातील चाकरमान्यांना होत नाही. त्यांना ही गाडी पकडण्यासाठी दिव्यापर्यंत यावे लागते. ही गाडी सुटण्याची वेळ सकाळची असल्यामुळे दादरवरून प्रवाशांना एक ते दीड तास आधी बाहेर पडावे लागते. साहित्य घेऊन बाहेर पडणाऱ्या या चाकरमान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
मेमू स्पेशल गाडीच्या ३९ फेऱ्यांचे नियोजन – यंदा प्रथमच धावणारी दिवा ते रत्नागिरी मेमू स्पेशल गाडीच्या ३९ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ही गाडी रोज धावणार आहे. सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही गाडी दिवा स्थानकातून रत्नागिरीला ती दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी ती दिवा जंक्शनला पोहोचेल… रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली व संगमेश्वर रोड. यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरीपर्यंत प्रथमच धावणाऱ्या गणपती स्पेशल मेमू गाडीला एकूण १२ डबे जोडले जाणार आहेत.