जून आणि जुलैमध्ये बंद असलेली मासेमारी ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाली. त्यामुळे ताज्या माशांची आवक बाजारात सुरू झाली आहे. बांगडा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे बांगड्याचे दर घसरले आहेत. इतर माशांचे भाव मात्र सुधारले आहेत. पावसाने विश्रांती घेतली असून वारेही थांबले आहेत. त्यामुळे समुद्र शांत आहे. मच्छीमारांना समुद्रात ये-जा करणेही सुरक्षित झाले आहे. यंदा सुरूवातीपासूनच मच्छीमारांच्या जाळ्यात बांगडा चांगल्याप्रकारे सापडत आहे. त्यामुळे बांगड्याचा दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलो आहे. कोळंबीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यामुळे, त्याचे दरही घसरले आहेत.
रत्नागिरीतील मिरकरवाडा, दापोलीतील हर्णे या सारख्या मोठ्या बंदरांवर माशांची उलाढाल सुरू झाली आहे. बांगडा वगळता पापलेट, सरंगा, म्हाकूळ, बोंबील, सुरमई यासारखे मासे काही प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचे दर वधारलेले आहेत. सध्या ट्रॉलिंग, गिलनेटच्या साह्याने मासेमारी सुरू आहे. १ सप्टेंबरपासून पर्ससिननेट मासेमारी सुरू होईल. त्यानंतर बाज़ारातील माशांचे दर कमी होतील, असा मच्छीमारांचा अंदाज आहे. रत्नागिरीतील किनारी भागात केंड माशाचा त्रास मच्छीमारांना जाणवत आहे. हा मासा झुंडीने राहतो आणि जाळी फाडतो. त्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होते.
सध्याचे माशांचे दर – बांगडा – ८० ते १००रु. किलो, कोळंबी – २५० ते ३०० रु. किलो, हलवा – ६०० ते ८०० रु. किलो, पापलेट – ७०० ते ८०० रु. किलो, मोडोसा – ६०० रु. किलो, ‘बोंबील – २३० ते ३०० रु. किलो, सौंदळ – ३०० ते ३३० रु. किलो समुद्र काही प्रमाणात खवळलेला असल्याने यांत्रिक बोटी अद्यापही समुद्रात गेलेल्या नाहीत. दरम्यान, ज्या बोटी समुद्रात जात आहेत त्यांच्या जाळ्यात बांगडा बंपर प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे, बांगड्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.