राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा १०८ रुग्णवाहिकेची सेवा २०१४ पासून सुरू आहे. तेव्हापासून आजपर्यंत अत्यंत कमी पगारात चालक काम करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र रुणवाहिका क्रमांक १०८ वाहनचालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र या विषयावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. शासनाने याचा विचार न केल्यास १ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारू, असा इशारा संघटनेने दिला असून तसे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक देण्यात आले. विव्हीजी कंपनीकडून वाहन चालकांना अत्यंत कमी पगार देऊन शोषण सुरू आहे, असा आरोपही चालकांनी निवेदनातून केला होता.
याबाबतचे निवेदन वाहनचालकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिले होते. त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी २५ जुलैला बीव्हीजी कंपनीचे संबंधित प्रकल्पाचे संचालक, प्रशासकीय अधिकारी आणि वाहनचालक यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये बीव्हीजी कंपनीने वाहन चालकांसोबत एक बैठक घेत त्यांच्या मागण्याबाबत योग्य विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतू अनेक महिने झाले तरी देखील वाहनचालकांसोबत कोणतीही चर्चा बीव्हीजी कंपनीने केली नाही.
त्यानंतर १०८ रुग्णवाहिका वाहनचालक संघटनेने कंपनी सोबत पत्रव्यवहार करत वाहनचालकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी कंपनी व्यवस्थापनाकडे मागणी केली होती. परंतु कोणतीही दाद दिली नाही. कंपनीच्या या भूमिकेवर संतापलेल्या महाराष्ट्रातील वाहनचालक संघटनेने १ सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन आणि उपोषणाचा निर्णय घेतला आहे.