राज्यात यंदाच्या निवडणुकीपासून ८० वर्षाच्या वरील आणि दिव्यांग मतदारांसाठी व्होट फ्रॉम होम हा उपक्रम राबविला जाणार आहे. म्हणजे घरबसल्या ते मतदान करू शकणार आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रियेची सर्व तयारी केली जाणार असून त्यानंतर निवडणुका केव्हाही लागल्यास राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसाठी सज्ज असेल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
निवडणूक यंत्रणा आहे, म्हणून लोकशाही वातावरण आहे, असे नाही. लोकशाही वातावरण आहे, म्हणून निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु या प्रवाहात राज्यातील सर्व जातीच्या लोकांना आणण्याचे मोठे आव्हान आमच्या समोर आहे. अजूनही काही जाती या प्रवाहाच्या बाहेर आहेत. एवढेच नाही तर १८ ते १९ वयोगटातील युवकांचा कमी प्रमाणात सहभाग आणि शहरी भागात कमी होणारे मतदान ही चिंतेची बाब आहे. त्यासाठी लोकशाहीच्या गप्पा, ग्रामपंचायत, प्रभागामध्ये मतदार यादीचे वाचन, असे काही प्रभावी उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत सर्व तयारी करून ठेवली जाणार आहे. त्यानंतर कधीही निवडणूका लागल्या तरी आम्ही तयार असणार आहे. २१ ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. लोकांमध्ये यांची जनजागृती व्हावी, यासाठी ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाणार आहे. असे देशपांडे यांनी सांगितले.