रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहेत. याचा परिणाम मासेमारीवर झाला असून, ५० ते ६० टक्के नौकाच समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. या नौकांना चांगला दर मिळवून देणारी मासळी मिळत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये सुरमई, पापलेट, सरंगा महागले आहेत. फिश मिल कंपन्यांना विकली जाणारी छोटी मासळी बऱ्यापैकी मिळत आहे. मात्र, या मासळीचे दर कंपनीकडून ४० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. त्यामुळे मासेमारीचा प्रारंभ फारच दयनीय आहे. रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला असून, जिल्ह्यात साडेचार हजार पेक्षा अधिक यांत्रिकी मच्छीमार नौका आहेत.
यामध्ये सुमारे २८० पर्ससीननेट नौका आहेत. पर्ससीननेट मासेमारी सप्टेंबरपासून सुरु होते. परंतु पावसाळ्यानंतरची नौकांची आवश्यक ती दुरुस्ती वेळेत होऊ शकली नाही. आर्थिक अडचणीमुळे खलाशी आणि तांडेल नौका मालकांना आणता आले नाहीत. या तांडेल आणि खलाशांना नौकांवर आणण्यापूर्वी आगाऊ रकमा द्याव्या लागतात. त्यामुळे प्रत्यक्षात पर्ससीन मासेमारी १० सप्टेंबरपासूनच सुरू झाली. सुरुवातीला १० ते १५ टक्के नौकांनाच मासळीचा चांगला रिपोर्ट मिळाला. उर्वरित नौकांना फिश मिल कंपन्यांसाठी उपयोगी असणारी मासळी मिळाली.
फिश मिल कंपन्यांना लागणाऱ्या मासळीची किंमत जी २० रुपये किलो दराची होती, हा दर आता १० ते १२ रुपयांवर आला आहे. त्यामुळे बारीक मासळी मिळाली तरी नौकांचा रोजचा खर्चही निघेनासा झाला आहे. मासेमारीमध्ये ही शुक्लकाष्ट सुरू असतानाच गेल्या दोन दिवसांपासून समुद्रात जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे पारंपरिक आणि पर्ससीननेट मासेमारीला काहीशी खीळ बसली आहे. सुमारे ५० टक्के नौकाच मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत. धोका नको म्हणून ५० टक्के मासेमारी नौका बंदरातच उभ्या आहेत.