शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. मात्र ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली याचा तपशील मिळालेला नाही. या भेटीनंतर राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राजन साळवी आमचे सहकारी आहेत, असे सांगत १० तारखेला बघू, असे सूचक वक्तव्य खा. संजय राऊत यांनी केल्याने १० तारखेला नेमके काय होणार? या विषयी जिल्ह्याच्या राजकारणात उत्सुकता आहे. राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर राजन साळवींनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. पराभवाची कारणमिमांसा करताना या पराभवाला पक्षातीलच काही नेते जबाबदार असल्याचे रांजन साळवींचे मत असून त्याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना माहिती दिली. आता जो काही निर्णय घ्यायचा तो उद्धव ठाकरे घेतील, असे या भेटीनंतर राजन साळवींनी प्रसार माध्यमांना सांगितले होते.
भाजपच्या वाटेवर? – दरम्यान नाराज असलेले राजन साळवी हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त होते. लवकरच ते भाजपात प्रवेश करतील असे बोलले जात होते. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संपर्कातून हा प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र अजूनही त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास आपण समर्थ आहोत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर राजन साळवींनी दिली होती. त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत.
शिंदेंना भेटले ? – या पार्श्वभूमीवर राजन साळवींनी दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त एका अग्रगण्य वृत्त वाहिनीने दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून साळवी शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मला माहित नाही : उदय सामंत – दरम्यान राजन साळवी यांच्या प्रवेशाबाबत मला माहिती नाही. एकनाथ शिंदे आणि माझ्यात त्याबाबत चर्चा झालेली नाही. त्यांना कदाचित त्यांच्या प्रवेशाबाबत माहिती असेल असे ना. उदय सामंत यांनी सांगितले. मात्र साळवी आणि एकनाथ शिंदेंची भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
साळवी आमचे सहकारी – दरम्यान राजन साळवी हे आमचे सहकारी आहेत, असे उबाठाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या संदर्भात मी कस काय बोलू? असा प्रश्न विचारात राजन साळवी आमच्या सोबत आहेत, या क्षणापर्यंत ते आमचे सहकारी आहेत. बाकी १० तारखेला बघू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
१० तारखेला काय होणार? – १० तारखेला बघू असे खा. संजय राऊत यांनी सांगितल्याने १० तारखेला नेमके काय होणार आहे, या विषयी उत्सुकता आहे. १० तारखेला साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश तर करणार नाहीत ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.