कोको कोला कंपनीचे आम्ही स्वागत करतो खरे तर ही कंपनी ही आमचे नेते अनंत गीते हे उद्योगमंत्री असताना आणली, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात भूसंपादन झाले. कोकाकोलाच नाही तर त्याच ठिकाणी अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये साकारत असलेला रेल्वेचा कारखाना देखील माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नाने झाला आहे, मात्र भूमिपूजनाची घाई करीत शिंदे सरकार याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप दापोलीचे माजी आमदार आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय कदम यांनी केला आहे.
गुरुवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी अतिरिक्त लोटे एमआयडीसी मध्ये साकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय हिंदुस्तान कोको कोला ट्रॅव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड या अडीच हजार कोटींच्या प्रकल्पाच्या भूमि पूजनासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत हे खेडमध्ये आले होते यावेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकण विकास प्राधिकरणाची आम्ही अंमलबजावणी करू कोकणचा माणूस साधा भोळा आहे, प्रेमळ आहे कोकणात विविध उद्योग येण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत, कोकणच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मुंबई ते गोवा ग्रीन फिल्ड रोड बनवू अशा प्रकारचे भाषण केले. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार संजय कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री गुरुवारी खेडमधील लोटे आले एमआयडीसीमध्ये कोकणचा विकास हाच ध्यास, असा नारा देऊन गेले. कोकाकोला कंपनी आली त्याचे आम्ही स्वागत करतोय, मात्र जिल्ह्यातली सर्वात मोठी असलेल्या लोटे एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या बंद पडत चालल्या आहेत. अनेक कंपन्या डबघाईला आल्यात, काही कंपन्या गुजरातला गेल्या, जिल्ह्यातली मोठी आणि उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यात असलेल्या या एमआयडीसीमध्ये कंपन्यांना १० ते १५ दिवस उत्पादनासाठी पाणी देखिल मिळत नाही. उद्योजक अक्षरशः वैतागले आहेत. हे वास्तव मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावे. ग्रीन फिल्ड रस्त्याचे स्वप्न दाखवताना, गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाच्या पूर्णत्वासाठी आश्वासनांशिवाय काय केले हे मुख्यमंत्र्यांनी कोकणी जनतेला सांगावे, असे ते म्हणाले.