शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागा हस्तांतरणानंतर तिथे नव्याने प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी राजापूर नगरपालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्या ठिकाणी व्यापारी गाळ्यांबरोबर सर्व सुविधांयुक्त प्रशासकीय कार्यालय उभे राहणार आहेत; मात्र त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. गेले कित्येक वर्षे रखडलेल्या शहरातील जुन्या ग्रामीण रुग्णालयाची जागा पालिकेकडे हस्तांतरण करण्यासाठी माजी आमदार गणपत कदम, माजी विधान परिषद सदस्या अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यानंतर जागेच्या मोबदल्यापोटी ५० टक्के रक्कम शासनाला भरून ती जागा नगरपालिकेकडे हस्तांतर करण्यात आली आहे.
राजापूर पालिका हद्दीतील मुख्य रस्त्यावरील जुन्या ग्रामीण स्रणालयाची जागा ही नगर पालिकेच्या मालकीची होती. त्या वेळी रुग्णालयाचे शासनाकडे हस्तांतरण करताना पालिकेने जागेसह ते हस्तांतरण केल्याच्या जागेची मालकी ही शासनाच्या आरोग्य विभागाकडे गेली होती. शहर विकास आराखड्यात राजापूर ग्रामीण रुग्णालयासाठी स्वतंत्र भूखंड आरक्षित ठेवला व त्यावर शासनाने ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधून त्या जागेत रुग्णालय सुरूही केले. त्यामुळे जुनी ग्रामीण रुग्णालयाची जागा पालिकेला परत करावी, अशी मागणी होती; मात्र शासनाकडून याची दखल घेतली गेली नाही.
याबाबत गतवर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी जागेच्या बदल्यात पालिकेने जागेची किंमत ३६ लाख रुपये शासनाकडे जमा करावेत त्यानंतर ही जागा हस्तांतरण केली जाईल, असे कळवले होते; मात्र क वर्ग पालिकेला एवढे पैसे भरून जागा घेणे शक्य नाही. ती जागा मूळ आमच्याच मालकीची असल्याने ती विनामोबदला परत द्यावी, अशी मागणी पालिकेने केली होती. या प्रकरणी तत्कालीन विधान परिषद सदस्या अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी शासनाकडे पाठपुरावा करत ती जागा विनामोबदला पालिकेला हस्तांतरण करावी, अशी मागणी केली.
त्यावर तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ती जागा ५० टक्के रक्कम भरून घेऊन पालिकेला हस्तांतरण करावी, असे आदेश दिले. यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी कळवलेल्या जागेच्या किमतींच्या ५० टक्के रक्कम पालिकेने शासनाकडे जमा करावी व त्यानंतर ही जागा नगर पालिकेकडे हस्तांतरण केली जाईल, असे शासनाने कळवले. नगरपालिकेने एकूण १४ गुंठे क्षेत्र असलेल्या या जागेसाठी शासनाकडे १७ लाख २१ हजार रुपये भरून ही जागा दोन वर्षापूर्वी पालिकेने ताब्यात घेतली आहे. आता ही इमारतही जुनी होत आल्याने व प्रशासकीय कामकाजाला अपुरी पडत असल्यामुळे या जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेत व्यापारी गाळ्यांसह नवी सुसज्ज
सर्व सुविधांनीयुक्त प्रशासकीय इमारत बांधण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. यासाठी प्राथमिक स्वरूपात आराखडा तयार करण्यात येऊन तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला; मात्र शासनाकडून परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश नगर परिषद प्रशासनाला दिले आहेत. त्याकरिता नव्याने आर्किटेक्ट नेमून हा प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. त्याकरिता निधी उपलब्ध करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.