आगामी लोकसभा निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांची बैठक नागपूरमध्ये घेतली. या बैठकीनंतर सर्वच जिल्हाध्यक्षांना दिलेल्या सूचनेप्रमाणे कोकणातही भाजपने मोठ्या प्रमाणात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. विधानसभेच्या निवडणुका साधारण वर्षभरात होण्याची शक्यता आहे. नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.
या प्रक्रियेमध्ये रायगड लोकसभा मतदार संघांत भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रायगड लोकसभा संयोजक धैर्यशील पाटील, माजी आमदार डॉ. विनय नातू, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे काम बघत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील रत्नागिरी जिल्ह्यातील भागात प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष केदार साठे, राजेश सावंत, माजी आमदार बाळ माने, सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख आदींसह स्थानिक मंडळ अध्यक्ष व पक्षाचे पदाधिकारी सहभागी होत आहेत.
दुसरीकडे पदवीधर मतदार संघ नोंदणीचा कार्यक्रमही भाजपच्यावतीने जिल्ह्यामध्ये अग्रक्रमाने राबवला गेला. गुहागरमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे.