नगरपालिकेतील प्रभारीच्या कारभारामुळे दैनंदिन कामकाजाचा बोजवारा उडालेला असतानाच आता नवनव्या समस्यांची त्यात भर पडत आहे. मुख्याधिकाऱ्यांसाठी एल. पी. स्कूलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे उभारलेल्या निवासस्थानाची पडझड झाली आहे. मागील सात वर्षांपासून निवासस्थानाचा वापरच झालेला नाही. देखभाली अभावी मुख्याधिकाऱ्यांच्या नगरपालिका शासकीय निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली आहे. ते फक्त नावापुरतेच उरलेले आहे. शासकीय मुख्याधिकाऱ्यांसाठी पालिका कार्यालयापासून दहा मिनिटाच्या अंतरावरील निवासस्थानामुळे गैरसोय दूर झाली झाली होती. खेडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवननजीक निवासस्थानाची उभारणी करण्यात आली.
यापूर्वी येथील तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचीही पालिकेत कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यानंतर ते शासकीय निवासस्थानात वास्तव्यास होते; मात्र त्यांची दापोली येथे बदली झाल्यानंतर शासकीय निवासस्थान ओसच पडले. पुढे पालिकेत प्रभारींचा प्रकार सुरू झाल्यानंतर शासकीय निवासस्थानाकडे कुणीच फिरकलेले नाही. तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचे वास्तव्य वगळता त्यानंतर आलेल्या एकाही मुख्याधिकाऱ्याने त्या निवासस्थानाचा वापर केलेला नाही. वापर नसल्यामुळे इमारतीच्या छतावरील साहित्यांची मोडतोडच झाली असून, कोणत्याही क्षणी छप्पर कोसळण्याची शक्यता येत नाकारता नाही. देखभालीकडे नगर प्रशासनाकडून दुर्लक्षच करण्यात आले आहे.