रास्त दराच्या धान्य दुकानात जाऊन कुटुंबातील सर्वच व्यक्तींना धान्य वितरणासाठी आवश्यक असलेली गणना (ई-केवायसी) करण्यासाठी दुकानदाराकडोल यंत्रावर अंगठा लावून नोंद करणे खर्चिक व वेळ काढूपणाचे आहे. यामुळे आता गावपातळीवर यासाठी शिबिर लावण्यात येणार आहे. पुरवठा विभागातर्फे त्याचे नियोजन करण्यात देणार आहे. ई-केवायसी करण्यासाठी कुटुंबातील सर्वच व्यक्तींना दुकानात जावे लागते. यामध्ये वयोवद्ध व दिव्यांग व्यक्तींना सोयीचे ठरत नाही. त्यामुळे गावपातळीवर शिबिर आयोजित करून याची पूर्तता करण्यात येणार आहे.
पुरवठा विभागामार्फत गावपातळीवरील रास्त दराच्या धान्य दुकानाद्वारे गावागावांतील नागरिकांना धान्य वितरित करण्यात येते. अलिकडे काही वर्षांत लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीचा अंगठा यंत्रावर (थम) घेऊन धान्य देण्यात येते. इथपर्यंत नागरिक सहन करत होते; मात्र सध्या गणना करण्याच्या कारणास्तव कुटुंबातील सर्व व्यक्तींना धान्य दुकानदाराकडे जावे लागत आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.
काही कुटुंबातील व्यक्ती वयोवृद्ध, दिव्यांग व आजारामुळे उपचार घेत असतात. अशावेळी सर्वच व्यक्तींना रास्त दराच्या धान्य दुकानात जाणे शक्य होत नाही. ही बाब खर्चिक आहे. अनेक अडचणींवर मात करून दुकानात गेल्यावर नेटवर्क समस्यांमुळे ताटकळत बसावे लागते. यामुळे असे लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यासाठी गावपातळीवर शिविर लावल्यांस सर्वांना सोयीचे होईल. यामुळे शिबिर आयोजित करून लाभार्थ्यांची गणना करण्यात येणार आहे. प्रत्येक तहसील स्तरावर तसे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.