मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने केवळ एकाच दिशेने म्हणजे मुंबईकडून येताना वाहतुकीला परवानगी दिलेली आहे, तरीही गेल्या काही दिवसांपासून या बोगद्यातून विनापरवाना काही वाहनचालक गोव्याहून मुंबईच्या दिशेनेही वाहने नेत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता असून, बांधकाम विभागाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा हा पोलादपूरहून खेड येथे अल्पावधीत पोहोचण्यासाठी सोयीचा मार्ग आहे.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसाठी लहान वाहनांना बांधकाम विभागाने बोगद्यातून प्रवासाची परवानगी दिलेली आहे; परंतु बांधकाम विभागाच्या या सवलतीचा काही वाहनचालक गैरफायदा घेत येथे नेमलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवा देऊन खेड दिशेकडून बोगद्यात प्रवेश करतात. या प्रकारामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात बोगद्यामध्ये होण्याची भीती वाहनचालकांतून व्यक्त होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनीही याला दुजोरा दिला.
आम्ही याबाबत कठोर पावले उचलणार असून, दोन्ही बाजूला गृहरक्षक दलाचे जवान सुरक्षेसाठी नेमले आहेत. त्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना करत आहोत. स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करून वाहनचालकांनीदेखील नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. एप्रिलअखेर दोन्ही बोगद्यांमधून वाहतूक सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत, अशी माहितीही गोसावी यांनी दिली.