हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात राजापूरसह रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण तालुक्यात सोमवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उष्मा आणि ढगाळ वातावरण होते. राजापूरमध्ये सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. वेगवान वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटात सुमारे अर्धा तासाहून पडलेल्या पावसाने राजापूरवासीयांची त्रेधातिरपीट उडाली. रस्त्यावर आलेल्या पावसाचे पाण्याबरोबर काळोखातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली. वाऱ्यामुळे वीजपुरवठाही खंडित केला होता. राजापूरमध्ये दिवसभर कडाक्याचे ऊन होते. आर्द्रता वाढल्यामुळे उष्माही अधिक जाणवत होता.
दुपारी ढगाळ वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले होते. सायंकाळी राजापूर शहरासह पाचल, जैतापूर परिसरात जोरदार पाऊस झाला. वेगवान वाऱ्यामुळे अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडित केल्यामुळे सायंकाळी लोकांना अंधारात राहावे लागले. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरू केला नव्हता. वेगवान शेवटच्या टप्प्यातील आंबा तोडणीच्या कामात पावसाने व्यत्यय आणला आहे. पावसाच वेग असाच राहिला तर शिल्लक आंबा आणि काजू पीक मिळणे अशक्य असल्याची भिती बागायतदार, शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
दरम्यान, रविवारी रात्री रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. सुमारे पाऊणतासाहून अधिक काळ पाऊस पडत होता. रत्नागिरी शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी होते. जिल्हा परिषदेजवळील मुख्य रस्ता, जयस्तंभ परिसरात गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत होते. सुदैवाने रात्रीची वेळ असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना झालेला नाही. पालिकेकडून वेळेत स्वच्छता न झाल्यामुळे रत्नागिरीत ही परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचबरोबर अधुनमधून पडलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामात व्यत्यय आला होता. तसेच रस्ता चिखलमय झाल्यामुळे वाहने चालवताना कसरत करावी लागत होती.