दोन दिवस पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे या पावसाने रत्नागिरी- हातखंबा मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. खेडशी ते हातखंबा परीसरात कुठेही पाणी जाण्यासाठी गटारेच नसल्यामुळे मार्ग चिखलमय झाला. दुचाकी चालवण्याची कसरत करावी लागत आहे. या प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने पाहिलेले नसल्याचे स्थानिकांचे मत आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता. १०) सकाळ पर्यंतच्या चोविस तासात सरासरी ३०.८८ मिमी. पाऊस पडला आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ७६.११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सर्वात कमी खेड तालुक्यात १४.८५ मिलीमीटर इतका पाऊस पडला. जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाने सरींवर कोसळण्यास सुरुवात केली. रात्री मुसळधार कोसळणारा पाऊस दिवसा मात्र, विश्रांती घेत आहे. शुक्रवारपासून पावसाने जोर धरला. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी आणि बावनदीच्या पाणीपातळीत झाली आहे. वाढ या पावसाचा फटका मिऱ्या नागपूर महामार्गाच्या कामाला बसला आहे. हे काम संथगतीने सुरू असून पावसाळ्यापुर्वीच्या उपाय योजनांकडे दुर्लक्ष केलेले आहे.
या परिसरातील काही भागाचे कॉक्रिटीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित भागात रस्त्यावर खडी पसरवून ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी मातीचा रस्ता आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याचा वाहनचालकांना प्रचंड त्रास होत आहे. दुचाकी चालकांना त्यासाठी कसरत करावी लागते. रत्नागिरी ते हातखंबा हा वर्दळीचा रस्ता आहे. खेडशी ते हातखंबा भागात पाणी वाहून जाण्यासाठी गटारेच बांधण्यात आलेली नाहीत. चौपदरीकरणाचे रस्ते रुंद असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असणारे नाले बुजवले गेले आहेत. नवीन नाले निर्माण करणे गरजेचे असतानाही पावसाळा तोंडावर आला तरीही ठेकेदाराकडून अद्याप नाले तयार केलेले नाही.