मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अपूर्ण आहे. पहिल्याच पावसात निर्माण झालेल्या गोंधळामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ उपाययोजनांसाठी पावले उचलली आहेत. परशुराम घाटात पावसाळ्यामध्ये दरड कोसळून धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिथे चोवीस तास आवश्यक ती यंत्रणा तैनात केली आहे. तसेच पर्यायी मार्गावर पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना ठेकेदारांना सार्वजनिक विभागाकडून देण्यात आल्या आहेत. चिपळूण हद्दीतील परशुराम ते आरवली टप्प्याचे ९२ टक्के काम पूर्ण झाले असून त्यावर गेल्या सात वर्षांत चौपदरीकरणावर ६७० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
अपूर्ण राहिलेल्या कामामुळे पावसाळ्यात निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सरसावला आहे. परशुराम ते आरवली या भागातील उड्डाणपुलाच्या पिलर उभारणीचे काम पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. तसेच वालोपे येथील कोकण रेल्वेचा २०० मीटर पुलाच्या उभारणीसाठीचा निधी रेल्वे प्रशासनाकडेच वर्ग केला जाणार आहे. पेढे, आगवे, वालोपे येथील सुमारे ३५० मीटरची कॉंक्रिटची कामे अपूर्ण आहेत. पावसाळ्यात चिपळूण आणि सावर्डे येथे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी गटारांची स्वच्छता करून आवश्यक ती कामे करण्यास प्रशासनाने सुरूवात केली आहे.
पावसाळ्यात परशुराम घाटात दरडी कोसळण्याचा धोका असल्यामुळे तिथे आवश्यक ती यंत्रणा चोवीस तास तैनात केली गेली आहे. येथील पर्यायी मार्गावर पाणी साचणार नाही. याची खबरदारी घेण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीस सार्वजनिक विभागाकडून दिल्या आहेत. चिपळूणातून जाणारा उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुलाच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला असून, दोन पिलरच्यामध्ये अतिरिक्त पिलर उभारणीचे काम नव्याने हाती घेण्यात आले आहे. हे काम पावसाळ्यातही नियमीतपणे सुरू राहणार आहे. वालोपे येथील रेल्वेचा पूल उभारणीसाठी पूर्वीच रेल्वे प्रशासनाने भिंती उभारल्या होत्या. त्यावर केवळ कॉंक्रिट स्लॅब टाकण्याचे नियोजन होते. मात्र अनेक वर्षांपूर्वीचे हे काम असल्याने तिथे नवा पूल उभारण्याची आवश्यकता असल्याचे रेल्वे प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग विभागाला कळवले आहे. त्यानुसार या पुलासाठीचा निधी रेल्वे प्रशासनाकडे वर्ग केला जाणार आहे.