तालुक्यातील कुवेशी येथील एका आंबा कलमाच्या बागेला लावलेल्या तारेच्या फासकीत काळा बिबट्या (ब्लॅक पँथर ) अडकला. राजापूर वनविभागाने बुधवारी या ब्लॅक पँथरची फासकीतून मुक्तता करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. हा ब्लॅक पँथर नर जातीचा असून, त्याचे वय सुमारे ५ ते ६ वर्षे असल्याचे वनविभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत वनविभाग राजापूर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कुवेशी येथे हर्षद हरेश्वर मांजरेकर यांचे आंबा कलम बागेच्या कंपाउंडला लावलेल्या तारेच्या फासकीत ब्लॅक पँथर अडकल्याची माहिती पद्मनाथ उर्फ पिंट्या कोठारकर यांनी परिमंडळ वन अधिकारी यांना दूरध्वनीवरून दिली.
त्यांनी याची माहिती परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून त्यांच्यासमवेत राजापूरचे वनपाल, वनरक्षक व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन तारेच्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला फासकीतून मुक्त केले. ब्लॅक पँथरला सुस्थितीत पिंजऱ्यात घेऊन राजापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी प्रभास किनरे व पशुधन विकास अधिकारी प्राजक्ता बारगे यांनी बिबट्याची तपासणी केली. त्यामध्ये बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री करून राजापूर वनविभागाने विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरीजा देसाई व सहायक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.