मिऱ्या- नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाने गती घेतली आहे. रत्नागिरी ते दख्खन या टप्प्याची दोन वर्षांची म्हणजे मार्च २०२५ पर्यंतची अंतिम मुदत आहे; परंतु वर्षात हे काम ५५ टक्के पूर्ण झाले आहे. ३५ टक्के महामार्ग वाहतुकीस योग्य झाला आहे. पावसाळ्यातील संकटांवर मात करीत कंपनीने युद्धपातळीवर हे काम सुरू ठेवले आहे. ज्या ठिकाणी अडचणी, तक्रारी आहेत त्या तत्काळ सोडविण्याच्यादृष्टीने प्रयत्न आहेत, अशी माहिती मिऱ्या-नागपूर महामार्गाचे प्रकल्प अधिकारी वसंत पंदेरकर यांनी दिली.
नागपूर ते रत्नागिरी असा ५४८ किमी राष्ट्रीय महामार्गाची मार्च २०१३ मध्ये अधिसूचना जारी झाली. तुळजापूर, लातूर, अहमदपूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर असा पहिला टप्पा आहे. सोलापूर, सांगोला, कोल्हापूर, रत्नागिरी असा दुसरा टप्पा निश्चित करण्यात आला. दुसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनानंतर त्याला गती देण्यात आली. २०१५ मध्ये त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. ९३० कोटींचा हा प्रकल्प आहे. या महामार्गाच्या कामामध्ये पावसाचा व्यत्यय येत आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या खोदाईमुळे महामार्गावर चिखल झाला असून वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाली, नाणीज, साखरपा परिसरात महामार्गाच्या कामामुळे लगतच्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. अशा अनेक तक्रारी आहेत. त्याची दखल घेत याचे प्रकल्प संचालक श्री. पंदेरकर यांनी महामार्गाची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. तसेच तत्काळ त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. नाणीजसह अन्य भागांत महामार्गाच्या कामामुळे रहिवाशांना रहदारीत अडथळा निर्माण होत होता. तेथील चिखलयुक्त माती जेसीबाच्या साह्याने उपसण्याची कार्यवाही सुरू केली. मिऱ्या ते साखरपा या २६ किलोमीटर अंतरातील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले आहे. महामार्गासाठी आवश्यक असलेला ७८ टक्के भराव टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.