मुंबई-गोवा महाम ार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या तसेच अवघड अशा कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या कशेडी बोगद्याची दुसरी मार्गिका पुढील दोन महिन्याच्या आत म्हणजेच ऑगस्ट अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुली होणार असल्याची महत्त्वाची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा कोकणात येणाऱ्या आणि परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या
कशेडी बोगद्याला एकूण दोन लेन आहेत. दोन्ही लेनसाठी २ स्वतंत्र बोगदे आहेत. मुंबईकडे जाणारा बोगदा पूर्ण झाल्यामुळे गेल्या २ महिन्यांपासून एकाच बोगद्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या दिशेने वाहतूक सुरू होती. मात्र आता गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनच्या दुसऱ्या बोगद्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले असून गणपतीपूर्वी ऑगस्ट महिन्यात अखेर हा बोगदा देखील सुरू होईल अशी माहिती मुख्य अभियंता शेलार यांनी दिली आहे.
४४१ कोटींची तरतुद – नोव्हेंबर २०१८ मध्ये या बोगद्याच्या कमला सुरवात झाली , या प्रकल्पासाठी ४४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, कशेडी बोगदा तीन पदरी असून असे दोन बोगदे उभारण्यात येत आहेत. त्यातील गोव्याच्या बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचे काम ९० टक्के झाले असून ऑगस्ट महिन्या अखेरीस म्हणजेच येत्या २ महिन्यात या बोगद्यातून वाहतूक सुरु होणार असल्याचे महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी सांगितले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील कशेडी ते रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथील भोगाव इथपर्यंत कशेडी बोगदा हा २ किलोमीटरचा असून एक तासाचे अंतर अवघ्या, १० मिनिटात पार होणार आहे.