विविध कंपन्यांचे आयपीओ व शेअर मार्केटमध्ये कमी वेळात जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिकाला १७ लाख ८४ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, दिनेश मोहनलाल जैन (वय ६०, रा. थिबा पॅलेस) हे बांधकाम व्यावसायिक असून फेसबुकसह इतर सोशल मीडियावर ते नेहमी शेअर मार्केटसंदर्भात माहिती घेत असतात.
एम११ मॅक्सिमा फायन्साशिअल सिक्युरिटी या नावाची जाहिरात त्यांनी सोशल मीडियावर पाहिली. त्या जाहिरातीवर जी लिंक देण्यात आली त्यावरुन त्यांनी शेअर मार्केटसंदर्भातील व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन केला होता. या ग्रुपचे अॅडमिन असलेल्या कुणाल गुप्ता व जेनिस मेहरा या नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपद्वारे जैन यांच्याशी संपर्क साधून त्यांनी दिलेल्या लिंकद्वारे जैन यांना डिमॅट अकाऊंट, ओपन करण्यास सांगितले.
डिमॅट अकाऊंट ओपन केल्यानंतर आयपीओ व शेअर मार्केटमध्ये कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून जैन यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. जैन यांनी तब्बल १७ लाख ८४ हजार रुपये गुंतवले होते. त्यांनी गुंतवलेल्या पैशाची फसवणूक केल्याने जैन यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी कुणाल गुप्ता याच्याविरुद्ध भा.दं.वि.क. ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.