शहरातील दाटीवाटीने वसलेल्या बाजारपेठ परिसरासह लोकवस्तीमध्ये अनेक ठिकाणी धोकादायक इमारती उभ्या आहेत. त्या केव्हाही कोसळू शकतात. त्या धोकादायक इमारतीमधील रहिवास लोकांनी बंद करावा किंवा इमारतीचा धोकादायक भाग काढून टाकावा, अशी नोटीस शहरातील ४० इमारत मालकांना पालिकेने बजावली आहे. तसेच जी इमारत पूर्ण नादुरुस्त आहे ती तत्काळ पाडावी, अशी सूचनाही त्यामध्ये केल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सागंण्यात आले. शहरातील बाजारपेठेसह आजूबाजूच्या परिसरात दाटीवाटीने लोकवस्ती आहे.
विस्तार करण्यासाठी जागा नसल्याने लोकांना आहे तिथेच वास्तव्य करावयास लागत आहे. अनेक इमारती वर्षानुवर्षे दुरुस्ती न करताच उभ्या आहेत. इमारतींचे आयुर्मान संपल्यामुळे त्या धोकादायक यादीमध्ये गणल्या जात आहेत. त्या इमारती पावसाळ्यामध्ये कधीही कोसळून पडण्याची शक्यता आहे. तरीही या परिसरातून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांसह लगतच्या इमारतींमधील रहिवाशांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य धोके लक्षात घेऊन पालिकेने धोकादायक इमारत मालकांना नोटीस बजावली आहे.
नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदीनुसार मालकी वहिवाटीखालील इमारत जीर्ण अवस्थेत असल्यास पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा वादळी वाऱ्यांमुळे केव्हाही पडू शकते. त्या इमारतीजवळून ये-जा करणाऱ्यांसह शेजारच्या रहिवाशांना धोका पोचू शकतो. त्यामुळे इमारतीचा नादुरुस्त भाग त्वरित काढून टाकण्यात यावा. तसेच इमारतीमधील रहिवासी वापर बंद करावा. तशी कार्यवाही सोसायटी किंवा इमारत मालकांनी तत्काळ करावी, असे त्यात नमूद केले आहे. धोकादायक इमारत पडून जीवित वा वित्तहानी झाल्यास इमारत मालक जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आले आहे.