भरणे येथील ब्रिटिशकालीन जुना पूल अखेरची घटका मोजत आहे. नवा जगबुडी पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे जुन्या जगबुडी पुलाचा वापर पूर्णपणे थांबला आहे. यामुळे धोकादायक अवस्थेतील जुना पूल नावापुरताच राहिला असून, या पुलाबाबत प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दीडशेहून अधिक वर्षांपासूनचा जुना ब्रिटिशकालीन पूल अनेक घटनांचा साक्षीदार आहे. या जुन्या जगबुडी पुलावरून दिवसाकाठी हजारो वाहने धावत होती; मात्र तुफानी पर्जन्यवृष्टीत जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडताच जगबुडी पुलावरूनही पाणी वाहत होते.
यामुळे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावा लागत होता. वर्षानुवर्षे ही परिस्थिती कायम राहिली होती. याच जुन्या जगबुडी पुलावर १९ मार्च २०१३ मध्ये महाकाली खासगी आरामबसला झालेल्या भीषण अपघात ३७ जणांना प्राणास मुकावे लागले होते. अखेर महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावेळी या पुलालगत पर्यायी पूल उभारण्यात आला आहे. हा नवीन पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालकांची कटकटीतून सुटका झाली.
नवा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर जुन्या पुलावरूनही पादचाऱ्यांची वर्दळ सुरू होती; मात्र याच पुलासमोर संरक्षक भिंत उभारल्याने जुन्या पुलावरील पादचाऱ्यांची वर्दळ थांबली. सध्या नावापुरताच जुना पूल राहिला आहे. हा पूल तसाच ठेवायचा की त्यावर आणखी काय निर्णय घ्यायचा याबाबत अद्याप प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. पण या धोकादायक पुलाबाबत लवकर निर्णय व्हावा, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.