कोकण रेल्वे सुरू होऊन २५ वर्षे झाली. सुरुवातीला मोजक्या असणाऱ्या या मार्गावर सध्या ५०-५२ गाड्या धावत आहेत. उत्तर भारताला मुंबईमार्गे दक्षिण भारताला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्यामुळे संपूर्ण देशात कोकण रेल्वेला महत्त्वाचे स्थान आहे; मात्र वाढती वाहतूक हाताळण्यासाठी आता कोकण रेल्वेला एकेरी मार्ग कमी पडू लागला आहे. म्हणूनच संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण करावे, अशी मागणी कोकणवासीयांकडून होत आहे. कोकण रेल्वेच्या उभारणीत भारतीय रेल्वे ५१ टक्के, महाराष्ट्र २२ टक्के, कर्नाटक १५ टक्के, गोवा ६ टक्के व केरळ ६ टक्के इतका आर्थिक वाटा होता.
सर्वाधिक वाटा उचलूनही महाराष्ट्राच्या वाट्याला फार काही आलेले नाही. मुंबईशी जोडणारी केवळ एक तुतारी एक्स्प्रेस आहे. सावंतवाडी एक्स्प्रेस आणि रत्नागिरी फास्ट पॅसेंजर या दोन्ही गाड्या मुंबईपर्यंत न जाता दिव्यापर्यंतच जातात. या उलट गोव्यासाठी ६, तर मुंबई-मंगळुरूसाठी २ गाड्या आहेत. केरळ-तमिळनाडूसाठी, तर अगणित गाड्या आहेत. दादर-चिपळूण, पुणे-कल्याण-सावंतवाडी, मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनस-बोरिवली-वसई- सावंतवाडी, नांदेड-सावंतवाडी या गाड्यांची मागणी दीर्घकाळ प्रलंबित आहे तसेच सद्यःस्थितीत धावणाऱ्या केवळ चिपळूण, रत्नागिरी येथे थांबणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांना इतर काही तालुक्यांत थांबे मिळण्याची मागणी आहे.
हा सर्व अनुशेष भरून काढण्यासाठी संपूर्ण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण होणे आवश्यक आहे. सध्या रोहा-मडगाव मार्गाचा वापर क्षमतेच्या १६८ टक्के तर मडगाव – ठोकूर मार्गाचा वापर ११० ते १३० टक्केपर्यंत आहे. यापैकी रोहा-वीरमार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झालेले आहे. आता वीर-सावंतवाडी मार्गाचे दुहेरीकरण होणे आवश्यक आहे. स्वतंत्र कारभार असल्यामुळे रेल्वे मंत्रालय कोकण रेल्वेला अर्थसंकल्पीय निधी न देता कर्ज देते. यापूर्वी टप्पा दुपदरीकरणाचा एक प्रस्ताव २०२१ मध्ये कोकण रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. त्यावर कार्यवाही झालेली नाही.
२०२३-२४ च्या आर्थिक अहवालानुसार १ हजार ५०० कोटींचे कर्ज-रोखे व इतर संस्थांकडून घेतलेले ७ हजार ३३८ कोटी रुपयांचे एकूण कर्ज आहे तर सर्व खर्च व व्याज दिल्यानंतर निव्वळ नफा साधारण २५० कोटी रुपये आहे. दरम्यान, कोरेकडून पॅच दुहेरीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला आहे. हा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर असला तरीही दिलासादायक ठरणारा आहे. त्याला निधीची तरतूद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.