29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriआरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमानी चिंतेत - कोकण रेल्वे

आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमानी चिंतेत – कोकण रेल्वे

गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल झाले.

कोकण रेल्वेमार्गावरून नियमित धावणाऱ्या रेल्वेगाड्यांसह मध्य, कोकण व पश्चिम रेल्वेने तीन टप्प्यांत जाहीर केलेल्या २४२ गणपती स्पेशलच्या फेऱ्यांचेही आरक्षण फुल्ल झाल्यामुळे गणेशोत्सवात चाकरमान्यांना गाव गाठण्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या नजरा जादा गणपती स्पेशल गाड्यांवर आहेत तसेच उत्तर व दक्षिण रेल्वेमार्गावर लोहमार्ग देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी १७ सप्टेंबरपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे ऐन गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मध्य रेल्वेने पहिल्या टप्प्यात गणेशोत्सवासाठी २०२ गणपती जादा फेऱ्या जाहीर केल्या. त्यामध्ये दिवा- चिपळूण मेमू स्पेशलच्या ३६ फेऱ्यांचाही समावेश आहे. १६६ गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण खुले होताच अवघ्या ८ मिनिटांतच सर्वच फेऱ्या हाऊसफुल्ल होऊन चाकरमान्यांच्या हाती प्रतीक्षायादीवरील तिकिटे पडली होती. आरक्षित तिकिटांवर दलालांनीच डल्ला मारल्याचा आरोपही करण्यात आला; मात्र रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या सहाही गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल झाले. त्यामुळे पुन्हा चाकरमान्यांचा हिरमोड झाला.

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या २० फेऱ्यांचे आरक्षणही फुल्ल झाल्याने पदरी निराशाच पडली. तिन्ही टप्प्यांत चाकरमान्यांच्या पदरात प्रतीक्षायादीवरील तिकिटे पडल्याने गावी जाण्याच्या नियोजनावर पुरते पाणी फेरले गेले. याचा गणेशोत्सवात चाकरमान्यांना मोठा फटका बसणार आहे. प्रतीक्षायादीवरील तिकिटावरून प्रवास केल्यास दंडात्मक कारवाईसह कोणत्याही स्थानकात प्रवाशांना उतरवण्याची कारवाई केली जाणार आहे. यामुळे चाकरमान्यांची कोंडी झाली आहे. यामुळे वेटिंगचे तिकिट काढूनही आरक्षण डब्यातून प्रवास करता येणार नसल्यामुळे चाकरमान्यांना गाव गाठताना त्रास सहन करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular