मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे फाट्यापासून कशेडी घाटापर्यंतच्या रखडलेल्या गेलेल्या कामांसह मार्गामुळे खड्ड्यात गणेशभक्तांना यंदाही जीवघेणाच प्रवास करावा लागणार होता; मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी या मार्गाची पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. ३ सप्टेंबरपूर्वी महामार्ग सुस्थितीत आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार माणगाव पोलिसांत ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याने गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवत गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी कंबर कसली आहे.
खड्डे बुजवण्यासाठी ४ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या होत्या. त्यानुसार युद्धपातळीवर खड्डे बुजवून मार्ग सुस्थितीत आणण्याचे काम सुरू आहे. चाकरमान्यांसाठी ही समाधानकारक बाब असली तरी बुजवलेले खड्डे कितपत तग धरतील, हा प्रश्नच आहे. पाहणी दरम्यान ३ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यासह ठेकेदारांनी दिले होते. त्यानुसार युद्धपातळीवर काम सुरू असल्याचा दावा केल्यानंतर शिंदे यांनीही दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण होईल अन् कोकणात जाणारे चाकरमानी दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. प्रत्यक्षात दुसऱ्या बोगद्याचे काम संथगतीने सुरू आहे.
दुसऱ्या बोगद्याच्या भोगावकडील बाजूला अजून भराव करण्याचे काम सुरू आहे. बाजूपट्ट्या असलेल्या पुलाजवळील रस्ताही अद्याप जोडण्यात आलेला नाही. दुसऱ्या बोगद्याच्या कामादरम्यानची गटारे अपूर्णावस्थेत आहेत. पोलादपूरकडून खेडकडे येणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. अंतर्गत कामेही अपूर्ण आहेत. दोन्ही बोगद्यांना जोडणारे रस्ते अर्धवट आहेत. त्यामुळे दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक कितपत सुरू होईल याबाबत साशंकता आहे.