आदिवासी कातकरी समाजासाठी केंद्र व राज्यशासनाने जाहीर केलेली मोबाईल मेडिकल व्हॅन चिपळुणात दाखल झाली आहे. चिपळूणसह गुहागर व संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येक आदिवासी वाडीवर महिन्यातून दोन वेळा जाऊन या व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी केली जाणार आहे. चिपळूण तालुक्याचा विचार करता मुख्य वस्तीपासून आदिवासी वाड्या डोंगरभागात वसलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्या वाड्यांपर्यंत गावातील इतर ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणेला सहच पोहचणे शक्य होत नव्हते. त्याही परिस्थितीत आदिवासी राहत होते. अलीकडे शासनाने या समाजाकडेही लक्ष देण्यास सुरवात केली आहे. त्यांना घरकूल योजनेतून घरे, विजेची व्यवस्था, रस्ते व पाण्याच्या योजना गावात राबवण्यास सुरुवात झाली आहे.
हे सारे दिले असले तरीही आरोग्य सुविधेपासून आदीवासी वाड्या वंचित राहिल्या आहेत. परिणामी, अनेक आरोग्याविषयक समस्या जाणवतात. त्यामुळे शासनाने मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चिपळूण, गुहागर, संगमेश्वर या तीन तालुक्यांसाठी एक मोबाईल मेडिकल व्हॅन येथे दाखल झाली आहे. चिपळूण तालुक्यातील २१ गावांमधील ३० तर गुहागर व संगमेश्वरमधील सुमारे १० वाड्यांमध्ये महिन्यातून दोनवेळा ही व्हॅन जाईल. ग्रामस्थांची आरोग्य तपासणी व त्यांना औषध पुरवठा करणार आहे. या व्हॅनसाठी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली पाटील, औषध निर्माता मृणाली कदम, आरोग्यसेविका शृंखला सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही योजना सुरू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा लेखा व्यवस्थापक लता गुंजवटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, आरोग्यविस्तार अधिकारी मोहन जाधव, योगेश यहिदे, मनोहर तायडे, योगेश कांबळी यांचे सहकार्य लाभले आहे.
शासकीय योजनांचा लाभही मिळणार – मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कुटुंब नियोजन, प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात माता व बालसंगोपन, लसीकरण, साथरोग नियंत्रण, क्षयरोग, कुष्ठरोग व इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचबरोबर आयुष्मान भव गोल्डन कार्ड, आभाकार्ड काढण्यात येणार आहे.