29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeSindhudurgरत्नागिरी, सिंधुदुर्गात भाजपच्या पदरात केवळ एकच जागा?

रत्नागिरी, सिंधुदुर्गात भाजपच्या पदरात केवळ एकच जागा?

भाजपला एकही जागा मिळणार नाही या चर्चेला त्यांनी सुचक असे उत्तर दिले आहे.

कोकणात विशेषतः तळकोकणात म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या जागा वाटपात भाजपने नमते घेतले असून ८ पैकी ६ मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडणूक लढवतील असे जवळपास ठरल्याचे वृत्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकही जागा भाजपला मिळणार नसून सिंधुदुर्गातील कणकवली-देवगड-वैभववाडी हा एकमेव मतदारसंघ भाजपला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघ हा महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला असल्याची चर्चा सुरु आहे.

या पार्श्वभूमिवर भाजपचे संपर्कमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री ना. रविंद्र चव्हाण हे बुधवारी रेल्वेच्या कार्यक्रमासाठी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी जागा वाटपासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. भाजपचा कार्यकर्ता हा शिस्त आणि आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे. महायुतीत जो निर्णय होईल तो आदेश भाजपचा कार्यकर्ता पार पाडेल असा विश्वास व्यक्त करताना रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला एकही जागा मिळणार नाही या चर्चेला त्यांनी सुचक असे उत्तर दिले आहे.

शिंदे गटाला झुकते माप ? – विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी सुरु आहेत. २०१९च्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात असलेल्या ५ मतदारसंघांची निवडणूक शिवसेना (अखंडीत) आणि भाजपने युती करून लढविली. मात्र ५ पैकी एकाही मतदारसंघात भाजपचा अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हता. ५ पैकी दापोली-खेड- मंडणगड, चिपळूण-संगमेश्वर, गुहागर- चिपळूण-खेड, रत्नागिरी- संगमेश्वर राजापूर-लांजा-साखरपा या ५ मतदारसंघांपैकी ४ जागा शिवसेनेने जिंकल्या. तर चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.

महायुतीचे जागावाटप – या निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून रत्नागिरी जिल्ह्यातील ५ पैकी एकाही मतदारसंघात भाजपचा उमेदवार रिंगणात नसेल. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) लढवेल तर उर्वरित ४ मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार असतील.

भाजपला केवळ १ मतदारसंघ? – सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघ येतात. त्यातील देवगड-कणकवली- वैभववाडी हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून माजी मंत्री आणि विद्यमवान खा. नारायण राणे यांचे चिरंजिव नितेश राणे हे या मतदारसंघाचे सध्या प्रतिनिधीत्व करतात. यावेळी देखील हा मतदारसंघ भाजपला मिळणार असल्याचे राजकीय गोटात बोलले जाते.

सावंतवाडी, मालवण शिवसेनेला ? – सावंतवाडी-दोडामार्ग आणि कुडाळ-मालवण-वेंगुर्ला या २ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. सावंतवाडीमधून विद्यमान शालेय शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर हेच पुन्हा उमेदवार असतील अशी चर्चा सुरु आहे. कुडाळ-मालवणमधून शिवसेना कोणाला उमेदवारी देणार याविषयी औत्सूक्य आहे.

गुहागरवर भाजपचा दावा? – गुहागर विधानसभा मतदारसंघ हा. गेली अनेकवर्ष भाजपच्या ताब्यात होता. मात्र २००९ च्या निवडणुकीत जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला. तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदासभाई कदम हे या मतदारसंघात उमेदवार होते. त्यांचा त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढणाऱ्या भास्करशेठ जाधव यांनी पराभव केला. तेव्हापासून सलंग या मतदारसंघातून भास्करशेठ जाधव निवडून येत आहेत. सध्या ते शिवसेना ठाकरे गटाचे या मतदारसंघातील उमेदवार असतील असे मानले जाते. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी भाजपचे नेते आणि माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी तयारी सुरु केली आहे. मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खा. श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपूल कदम यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे.

दापोलीतून योगेश कदम? – दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.योगेश कदम हेच महायुतीचे उमेदवार असतील असे मानले जात आहे. रत्नागिरीतून सामंतांना उमेदवारी ? रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून गेली ४ टर्म निवडून येणारे रत्नागिरीचे विद्यमान पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत हेच शिंदे गटाचे उमेदवार असतील हे निश्चित मानले जात आहे. त्यांचे बंधू किरण सामंत हे राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.

शिंदेंना झुकतेमाप ? – तळकोकणातील जागा वाटपामध्ये भाजपला केवळ १ जागा मिळणार असून १ जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) लढवेल. उर्वरित ६ जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उम`दवार असतील अशी चर्चा सुरु आहे. महायुतीचे हे जागा वाटप जवळपास निश्चित असल्याचे संकेत देखील नेत्यांकडून मिळाले आहेत. भाजपचे इच्छूक उमेदवार आता याबाबत काय निर्णय घेतात आणि पक्षश्रेष्ठी त्यांना काय आदेश देतात याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular