गुहागर विधानसभा मतदार संघाची जागा भाजपला मिळावी यासाठी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांना गाऱ्हाणे घातले आहे. विधानसभेला भाजपची हक्काची जागा मिळत नसेल, तर जिल्ह्यातून भाजप हद्दपार होईल, अशी भीती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करून गुहागरच्या जागेवर तोडगा काढू, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. खासदार पाटील गुरुवारी (ता. १०) दापोली दौऱ्यावर होते. ते दापोलीला येणार असल्याचे समजल्यानंतर उत्तर रत्नागिरी भागातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी दापोलीला गेले. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी खासदार पाटील यांची भेट घेतली.
गुहागरची जागा भाजपला मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. चिपळूण तालुक्यातील ७२ गावे आणि खेड तालुक्यातील काही गावे गुहागरला जोडलेली आहेत. दापोली आणि गुहागर विधानसभा मतदार संघात विखुरलेला आहे. रत्नागिरी आणि गुहागर या दोन जागा भाजपच्या हक्काच्या आहेत. रत्नागिरीची जागा शिवसेनेच्या नेत्यांना सोडली जाणार आहे. दापोलीची जागा शिंदे गट शिवसेना लढवणार आहे. गुहागरची जागा भाजपला सोडावी नाहीतर जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व धोक्यात येईल.
भविष्यात महायुतीची सत्ता आली तरी कार्यकर्ते टिकवणे अवघड होऊन जाईल. त्यामुळे वरिष्ठांशी चर्चा करून गुहागरची जागा भाजपसाठी घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी खासदार पाटील यांच्याकडे केली. जिल्हाध्यक्ष साठे यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधून चर्चेतून आपली भूमिका मांडली. तुमच्या मागण्यांवर आम्ही सहमत आहोत. लवकरच त्यावर तोडगा निघेल. कार्यकर्त्यांनी धीर सोडू नये, असे आश्वासन खासदार पाटील आणि जिल्हाध्यक्ष साठे यांनी कार्यकर्त्यांना दिले.