लोकसभा निवडणुकीपासूनच राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार कोणकोण असणार याची चर्चा झडत होती. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी यांच्यात मोठी चुरस असतानाच आता महायुतीसह मविआमधील मित्रपक्षांत देखील संभाव्य उमेदवारीवरून नेहमीचीच स्पर्धा दिसून आली. विद्यमान आ. राजन साळवी हे पुन्हा इच्छुक असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून स्थानिक उमेदवाराचा मुद्दा पुन्हा एकदा रेटण्यात आला आहे. दर निवडणुकीत ते या आव्हानांचा सामना करीत आलेले आहेत. मात्र यंदा या पक्षाकडून माजी जिल्हासंपर्क प्रमुख पांडुरंग उपळकर, विधानसभा संपर्कप्रमुख अॅड. चंद्रप्रकाश नकाशे आदि इच्छुक आहेत.
तर दुसरीकडे मविआमधील काँग्रेस पक्षाकडून देखील मागील अनेक महिन्यांपासून या मतदारसंघावर दावा ठोकण्यात आला आहे. जिल्हयातील पाच मतदारसंघामध्ये केवळ राजापूर मतदारसंघात काँग्रेसची ताकत असल्याने काँग्रेसने येथून शड्डू ठोकले आहेत. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष अविनाश लाड इच्छुक आहेत. यापूर्वी या मतदारसंघात त्यांनी जोरदार बॅनरबाजी करून आपल्या उमेदवारीचे संकेत दिले होते. जोडीलाच काँग्रेसमधून माजी विधान परिषद सदस्या अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी देखील इच्छुकता दर्शवलेली आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघावरून काहीच आलबेल नसल्याचे पूर्वीच दिसून आलेले आहे. महायुतीमध्येही मोठी स्पर्धा आहे. लोकसभेला संधी हुकल्यानंतर किरण सामंत यांनी राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदार संघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. विविध भागातून मोठ्या प्रमाणवर पक्षप्रवेशाचे सोहोळे करताना प्रामुख्याने उबाठा सेनेला लक्ष्य करताना त्यांना धक्क्यावर धक्के दिले आहेत. उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी देखील आपल्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदार संघात विकासकामांची भूमीपूजने आणि उद्घाटने यांचा धडाका लावला आहे.
दरम्यान महायुतीमधील तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्यावतीनें सुध्दा राजापूर विधानसभा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा अशी मागणी होत आहे. या पक्षाचे नेते अजित यशवंतराव हे येथून लढण्यासाठी इच्छुक आहेत. भाजप कडून उल्का विश्वासराव याही इच्छुक आहेत. त्यांनीही अद्याप प्रयत्न सोडलेले नाहीत. त्यामुळे महायुतीमधून संभाव्य उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा दिसत आहे. याशिवाय या मतदारसंघातून आणखीही काही नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत यात कुणबी समाजातील तरूण नेते प्रकाश कातकर यांचा समावेश आहे.