23.3 C
Ratnagiri
Friday, December 27, 2024
HomeRajapurराजापूर, लांज्यात मुळुमुळु रडणारे नकोत तर 'हाती घेऊ ते तडीस नेऊ' असे...

राजापूर, लांज्यात मुळुमुळु रडणारे नकोत तर ‘हाती घेऊ ते तडीस नेऊ’ असे नेते हवेत : किरण सामंत

श्री. किरण सामंत हे 'ताज्या दमाचे व नव्या युगाचे शिलेदार' म्हणून ओळखले जातात.

“राजापूर, लांजा मतदार संघ आजही अविकसीत राहिला याचे कारण मागील १५ नव्हे तर २५ वर्षांत या मतदार संघात नाव घेण्याजोगे एकही विधायक कार्य मजबुतीने उभे ठाकले नाही. आता राजापूर, लांजाच्या विकासाचा ‘एल्गार’ करण्याखेरीज गत्यंतर नाही… याच भावनेने येथील सारे बंधू भगिनी आज इर्षेने पेटून उठले आहेत” असे खणखणीत प्रतिपादन लांजा, राजापूरचे महायुतीचे उमेदवार श्री. किरण सामंत यांनी केले. श्री. किरण सामंत यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘दै. रत्नागिरी टाइम्स’साठी मुलाखत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

नव्या युगाचे शिलेदार! – श्री. किरण सामंत हे ‘ताज्या दमाचे व नव्या युगाचे शिलेदार’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितले, “राजापूर, लांजा मतदार संघ हा केवळ मागील १५ वर्षे नव्हे तर २५ वर्षांपासून म्हणजेच पाव शतक विकासापासून वंचित राहिला आहे. या विभागाचा आता ‘विकासाचा बॅकलॉग’ भरुन काढावाच लागेल” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

विकासाची गंगा – श्री. किरण सामंत हे काहीबाही न बोलता थेट मुद्याला हात घालतात. त्यांनी सांगितले, “हा मतदार संघ सुमारे पाव शतक विकासापासून दूर राहिला, दोष कुणाला देणार? दोषारोप करीत बसण्यापेक्षा आता इर्षे ने उभे रहायचे आणि येथे ‘विकासाची गंगा’ आणायची असा आम्ही सर्वांनी ‘वसा’ घेतला आहे” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

मुळुमुळु रडणारे नकोत! – श्री. किरण सामंत हे एक कणखर बाण्याचे व कर्तबगार नेते म्हणून सुपरिचीत आहेत. त्यांनी सांगितले, “राजापूर, लांजा मतदार संघाच्या विकासासाठी धडक कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. त्यासाठी मुळुमुळू रडणारी व हताशपणे सबबी सांगणारी मंडळी कामाची नाहीत. ‘हाती घेऊ ते तडीस नेऊ’ अशी जिद्द बाळणगारी मंडळी सोबत आहेत” असे त्यांनी विनम्रपणे नमूद केले.

काम करणारा नेता ! – श्री. किरण सामंत हे एक ‘काम करणारा नेता’ म्हणून सुपरिचीत आहेत. ते कधीही जातीपाती, धर्म किंवा पक्ष पहात नाहीत. जो सहाय्यासाठी येतो त्याला मदत करण्यास ते तत्परतेने पुढे सरसावतात. त्यांनी ‘लाल फिती’च्या कारभाराची कधीच तमा केली नाही. रंजल्या गांजलेल्यांना त्यांनी नेहमीच न्याय मिळवून दिला हे त्यांचे वैशिष्ट्य होय!

रडणारा नव्हे, लढणारा हवा – श्री. किरण सामंत यांनी सांगितले, “मागील १५ वर्षे नुसते ‘मुळुमुळे रडणे’ सुरु आहे. विकास मार्गी लावायचा असेल तर रडत बसून चालणार नाही… तर लढणारा नेता हवा. म्हणूनच प्रत्यक्ष सत्तेवर नसूनही आम्ही या मतदार संघासाठी कैक विकास कामे मार्गी लावली याचे आम्हा सर्वांना समाधान वाटते” अशा शब्दात त्यांनी मनोभावना व्यक्त केली.

पाव शतक लोटले ! – श्री. किरण सामंत तडफेने बोलत लांजा त्यांनी सांगितले, “राजापूर, मतदार संघातील जनतेची दुःखे व व्यथा मागील २५ वर्षांपासून तशाच आहेत. राजापुरात दरवर्षी पूर येतो. त्यावर कायमस्वरुपी ‘तोडगा’ काढला का? लांजा महामार्गावरील शहर आहे. तेथे व्यापार उद्योगाचा विकास झाला का? साखरपा विभाग पर्यटन्न व शेतीसाठी ओळखला जातो पण पर्यटनाचा विकास झाला का?” असे एका मागोमाग एक सवाल त्यांनी उपस्थित केले.

विकास बोंबलतो आहे! – श्री. किरण सामंत हे एक अभ्यासूव व्यासंगी नेते म्हणून ओळखले जातात. ते नेहमीच ‘बाते कम, काम ज्यादा’ पद्धतीने वागतात. ते सांगतात, “१५ वर्षे नव्हे २५ वर्षे लोटली तरी देखील राजापूर, लांजाचा विकास बोंबलतो आहे. असे का घडले? तेथे प्रदूषणकारी प्रकल्पांऐवजी पर्यावरण’ पूरक ‘ग्रीन प्रोजेक्ट’ आणणे आवश्यक आहे” अशा शब्दात त्यांनी नेमक्या वर्मावर बोट ठेवले.

पर्यटन प्रकल्प हवेत – श्री. किरण सामंत यांनी पुढे सांगितले, “राजापूर, लांज्यातील जनतेची लोकेच्छा, मनोभावना व आवडी निवडी ध्यानी घेऊनच येथे ‘ग्रीन प्रोजेक्ट’ आणले पाहिजेत. राजापूर, लांजा, साखरपा हा सारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. येथे पर्यटनाचे प्रकल्प राबविले पाहिजेत” असे सडेतोड मत त्यांनी व्यक्त केले.

अनेक प्रकल्प मार्गस्थ – श्री. किरण सामंत विकासाचा विषय आला की मग दिलखुलासपणे बोलू लागतात. त्यांनी सांगितले, “मागील काही काळापासून आम्ही राजापूर, लांजा विभागात विधायक कार्य करीत आहोत. या परिसरातील जनतेसाठी आम्ही अनेक प्रकल्प मंजूर करुन आणले व मार्गस्थ केले आहेत” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्याचा लेखाजोखा – श्री. किरण सामंत हे ‘विकास पुरुष’ म्हणून ओळखले जातात. मागील काही काळात राजापूर व साखरपा विभागासाठी त्यांनी अनेक प्रकल्पांची आखणी करुन त्यासाठी. भरघोस निधी मंजूर करुन आणला आहे. त्यापैकी काही प्रकल्प मार्गस्थ झाले तर काही प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्याचा त्यांनी यावेळी लेखाजोखा सादर केला.

RELATED ARTICLES

Most Popular