राज्यातील सात सागरी जिल्ह्यांसाठी नऊ ड्रोन मिळणार असून, रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा व साखरीनाटे किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन ड्रोन मिळणार आहेत; परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील क्रमांक दोनचे बंदर म्हणून गणल्या जाणाऱ्या हर्णे बंदरामध्ये ड्रोनची नितांत गरज असून, शासनाने याबाबत विचार करून तातडीने हर्णे बंदरातदेखील ड्रोनची व्यवस्था करावी, अशी मागणी दापोली-मंडणगड गुहागर मच्छीमार संघटनेचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावसे यांनी केली आहे. दापोली तालुक्यातील एकमेव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील क्र. दोन बंदर म्हणून हर्णे बंदर ओळखले जाते. या बंदरात आजूबाजूच्या गावातील मिळून किमान १ हजार नौका पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात. हर्णे बंदरासमोरील समुद्रात ५ ते ६ नॉटिकल मैलावरच एलईडी आणि केरळमधील मलपीच्या फास्टर नौका राजरोसपणे अवैधरीत्या मासेमारी करतात.
या गोष्टीवरून अनेक मंत्र्यांना तसेच सरकारी कार्यालयात निवेदन देऊनसुद्धा कोणतीच कारवाई होत नाही. या कारवाईसंदर्भात कायदा पारित होऊनसुद्धा अद्याप तरी ठोस कारवाई केलेली नाही, अशी येथील मच्छीमारांची तक्रार आहे. गेली दहा वर्षे या बंदरातील मच्छीमारी या परप्रांतीय मासेमारीविरोधात लढा देत आहे. तरीदेखील ठोस निर्णय झालेले नाहीत. अनेक वेळा येथील खलाशांबरोबर समुद्रात झटापटी देखील झाल्या आहेत. अनेक वेळा अशा अवैधरीत्या मासेमारी करणाऱ्या मच्छीमार नौकांना येथील मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांना पकडून देण्यात मदत केली आहे. तरीही बंदरातील ही अवैध मासेमारी थांबतच नाही.