गेल्या काही दिवसांपासून चिपळूण हद्दीत मटका जुगार अड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक चौक व नाक्यावर हे अड्डे सुरु असल्याची बोंब केली जात आहे. त्याची दखल घेऊन जिल्हा युवक काँग्रेसचे साजिद सरगुरोह यांनी ‘मटका जुगार मुक्त अभियान २०२५’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ऑनलाइन स्वरूपात अड्डा दाखवा आणि ५ हजाराचे बक्षीस जिंका असे आवाहनही त्यांनी फलकाद्वारे केले आहे. त्यामुळे मटका जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. तसेच पोलिस याविषयी कोणती भूमिका घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोकण विभागात मटका जुगारचा सिलसिला वर्षानुवर्षे कायम राहिला आहे. त्याचे सूत्रे बऱ्याचदा चिपळूणम धूनच हलवली जात होती.
यातील काही मटका किंग सद्यस्थितीत सक्रिय नसले, तरी त्यांची यंत्रणा आजही अधूनमधून काम करताना दिसते. या यंत्रणेचे जाळे पुन्हा एकदा घट्ट होऊ लागले असून ऐन शिमगोत्सवात या यंत्रणेने डोके वर काढले. या पार्श्वभूमीवर जिल्हा युवक काँग्रेसचे साजिद सरगुरोह यांनी नुकतीच पोलिसांच्या मदतीने गोवळकोट रोड येथे धाड टाकली. या धाडीत फारसे हाती लागले नसले, तरी त्या भागात उघडउघड जुगार अड्डा चालवला जातो, याबाबतची चर्चा जोरदारपणे सुरु झाली आहे. एवढेच नव्हे तर शहराच्या प्रत्येक विभाग जुगार अड्डे चालवले जातात आणि चिपळूणच्या चार मटका किंगच्या नेतृत्वाखाली हे अड्डे चालवले जातात. त्यासाठी त्यांना ५ टक्के कमिशन एजंट लोक मोजत असतात, यातून त्यांची दररोज लाखोंची उलाढाल होते. मात्र या जुगार व मटक्याच्या जाळ्यात अडकवून विशेषतः कामगार वर्ग व तरुणांची लूट सुरु असल्याची चर्चा आहे.
या सर्व बाबींची दखल घेऊन जिल्हा युवक काँग्रेसचे साजिद सरगुरोह यांनी मटका जुगार मुक्त अभियान २०२५’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी एका अॅपद्वारे लोकेशन पाठवून ऑनलाईन पध्दतीने अड्डा उघडकीस आणल्यास संबंधिताला ५ हजाराचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यासाठी बॅनरवर स्कॅनरची सुविधाही उपलब्ध केली आहे. हे बॅनर बाजारपुल व शहरात जागोजागी उभारले आहेत. साजिद सरगुरोह यांच्या या अनोख्या उपक्रमाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला असून हे अड्डे उघडकीस आणण्यासाठी काही तरुण व सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत. यानिमित्ताने काहींनी चिपळूण शहरात लागलेली जुगार, मटक्याची ही कीड कायम स्वरूपी संपविण्याचा निर्धार केला आहे.