मुंबईतून आता कोकणात अवघ्या साडेचार तासांत पोहोचता येणार आहे. यासाठी कोणतीही नवी रेल्वे सुरु झालेली नाही. आणखी एका नव्या महाम ार्गाचीही घोषणा केली गेलेली नाही. ही वाहतुक हवाईही नाही तर मुंबईहून रो-रो सेवा सुरु केली जाणार आहे. राज्य शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदर विभाग मुंबई ते गोवा रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) बोट सेवा सुरु करण्याची योजना आखत आहे. होळी, मे महिना, गणेशोत्सव हे काही असे टप्पे असतात जेव्हा महाराष्ट्रातील शहरी भागांमधून अनेकांचेच पाय खेड्यापाड्याकडे वळतात. त्यातही कोकणच्या दिशेनं जाणाऱ्यांचा आकडा तुलनेनं मोठा असतो. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की त्याआधीच काही महिन्यांपूर्वी या सणासाठी रेल्वे आणि एसटीच्या तिकीटाच्या आरक्षण प्रक्रियेला सुरुवात होते. पण, प्रवाशांची वाढती संख्या पाहता जादा पर्याय उपलब्ध करून देऊनही अनेकदा काही प्रवाशांना मात्र निराशेचाच सामना करावा लागतो.
अशा संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आता महाराष्ट्र शासनानं एक अतिशय कमाल उपाय अमलात आणण्याचा विचार केल्याचं समोर आले आहे. हा विचार म्हणजे मुंबई ते गोवा रो-रो बोट सेवा. कोकणात दरवर्षी गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. याचदरम्यान मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतून अनेकजण कोकणत्या दिशेनं रवाना होतात. याच धर्तीवर प्रवाशांच्या अडचणी केंद्रस्थानी ठेवत मुंबई ते गोवा रो रो सेवेची आखणी करण्यात येत आहे. राज्य शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदर विभाग मुंबई ते गोवा रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) बोट सेवा सुरु करण्याची योजना आखत आहे. खुद्य मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली. रो रो बोट सेवा उपलब्ध झाल्यास सागरी मार्गानं प्रवास करत असतानाही प्रवाशांना त्यांच्या स्वतःच्या वाहनांनी प्रवास करता येईल.
या सेवेअंतर्गतं प्रवाशांना मुंबईतील माझगाव डॉक इथं जहाजावर चढता येईल. जवळपास साडेचार तासांमध्ये या माध्यमातून कोकणातील सिंधुदुर्ग इथं असणाऱ्या देवगड किनाऱ्यावर प्रवाशांना उतरता येईल. फक्त कोकणापर्यंतच नव्हे तर प्रत्यक्षात ही सेवा गोव्यापर्यंत विस्तारेल आणि या गोव्यापर्यंतच्या प्रवासासाठी साधारण साडेसहा तासांचा वेळ लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या रो रो उपक्रमामुळे हजारो भाविकांना आवश्यक दिलासा मिळेल. गणेश चतुर्थी दरम्यान एकूण प्रवासाचा त्यांचा अनुभव सुधारेल, असंही राणेंनी स्पष्ट केलं. आता या उपक्रमावर प्रत्यक्षात कधी काम सुरू होतं आणि यंदाच्या गणेशोत्सवात चाकरमान्यांना ही खास भेट देण्यात महाराष्ट्र शासन यशस्वी ठरतं का याकडे कोकण वासियांचे लक्ष लागून राहीले आहे.