मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. कशेडी बोगद्यामध्येदेखील पावसाचा अनुभव वाहनचालकांना मिळत आहे. संबंधित ठेकेदाराकडून बोगद्यात कोसळणारे पाण्याचे धबधबे रोखण्यासाठी सद्यःस्थितीत काम सुरू आहे; मात्र तरीही सिमेंटच्या बांधकामातून पाण्याचे फवारे बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने गळतीच्या या घटना गंभीर असल्याची बाब समोर येत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी पाहणी केली असून, त्यावर ठोस उपाययोजना सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा हा दोन किलोमीटरचा बोगदा आहे.
हे दोन्ही बोगदे सध्या दोन्ही बाजूकडील वाहतुकीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहेत. भर उन्हाळ्यात देखील या बोगद्यात पाण्याची गळती सुरू होती. सद्यःस्थितीत पावसामध्ये कशेडी बोगद्याला गळती लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या पावसाच्या पाण्यामुळे वाहनचालक आणि दुचाकीस्वार देखील त्रस्त झाले आहेत. गळती थांबविण्यासाठी व थेट वाहनांवर पडणारे पाणी रोखण्यासाठी कशेडी बोगद्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम सुरू केले आहे.
११ ठिकाणांच्या गळतीचे काम पूर्णत्वास – कशेडी बोगद्याला लागलेली गळती व बोगद्यात छतावरून कोसळणारे पाणी या घटनेची नुकतीच काही महिन्यांपूर्वी जीओलॉजिकल तज्ज्ञांनी पाहणी केली होती. त्यानुसार सद्यःस्थितीत दोन्ही बोगद्यांतील गळतीची १८ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यातील ११ ठिकाणांचे गळतीचे काम पूर्णत्वास गेले आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी पंकज गोसावी यांनी दिली.