कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी कोलाड-नांदगावरोड-वेर्णा दरम्यान चालवण्यात आलेल्या बहुचर्चित पहिल्या-वहिल्या ‘रो-रो कार’ सेवेचा प्रयोग फसला आहे. २३ ऑगस्टला अवघ्या पाच वाहनांसह धावलेल्या ‘रो-रो’ कार सेवेची नंतर कोकणवासीयांना धडधड ऐकायला मिळाली नाही. परतीलाही अजूनतरी ‘रो-रो’ कार सेवेसाठी गणेशभक्तांकडून ना विचारणा झाली.. ना बुकिंग यामुळे ‘रो-रो’ कार सेवेचा फज्जाच उडाला. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांनी अडथळ्यांची शर्यंत पार करत गाव गाठले. गणेशभक्तांना गाव गाठताना कराव्या लागणाऱ्या कसरतीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन पुढे सरसावले होते. यासाठी गणेशभक्तांची हलक्या वजनाची वाहने वाहून नेण्यासाठी कोकण मार्गावर प्रथमच ‘रो-रो’ कार सेवेचा प्रयोग करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. मात्र, सुरुवातीपासूनच ‘रो-रो’ कार सेवेकडे गणेशभक्तांनी पाठ फिरवली.
‘रो-रो’ कार सेवेऐवजी कोकण मार्गावर जादा विशेष गाडी चालवण्याचा आग्रह कोकणवासीयांनी धरला होता. कोकण रेल्वे प्रशासनाने अखेरपर्यंत अट्टहास न सोडता सेवेच्या नोंदणीसाठी सलग चारवेळा मुदतवाढीचा ‘फंडा’ वापरूनही गणेशभक्तांचा ‘थंडा’च प्रतिसाद लाभला. कोलाड येथे चढणारी वाहने थेट नांदगावरोड अथवा वेर्णा स्थानकात उतरवण्यात येणार होते. यासाठी भाडेही अवाजवी आकारण्यात येणार होते. ‘नाकापेक्षा मोती जड’ अशीच अवस्था झाल्याने सेवेसाठीच अवघ्या ५ जणांचीच नोंदणी झाली होती. किमान १६ वाहनांची नोंदणी आवश्यक होती. अशा बिकट परिस्थितीत कोकण रेल्वे प्रशासनाने पहिली-वहिली ‘रो-रो’ कार सेवा चालवली.

