तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथील श्रीमती वैशाली शांताराम शेटे या वृध्द महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून याप्रकरणी राजापूर पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या महिलेच्या अंगावरील व घरातील सोन्याचे दागिने व अन्य मौल्यवान दस्तऐवज जागेवरच असल्याने नेमका या महिलेचा खून का? कुणी? व कशासाठी? केला असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. दरम्यान बुधवारी सायंकाळी उशीरा शवविच्छेदन करून या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील पूर्व भागातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवारी सकाळी ही खळबळजनक घटना उघड झाली होती. श्रीमती वैशाली शेटे या वृध्द, महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला होता.
या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली होती. तत्काळ पोलीस यंत्रणेने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. दरम्यान श्वान पथकासह, फॉरेन्सिकची टीम आणि स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या पथक यांनी आपल्या पध्दतीने तपास हाती घेतला आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देत पहाणी केली व तपासकामाबाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी सुरेश कदम यांच्यासह राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव हे घटनास्थळी तळ ठोकून या प्रकरणी तपास करत आहेत.
सोमवारनंतर दिसल्या नाहीत – सोमवारी सायंकाळनंतर वैशाली शेटे या गावात कोणाला दिसल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांचा सोमवारी रात्री अथवा मंगळवारी अशा प्रकारे मृत्यु झालेला असावा असाही पोलीसांचा कयास आहे.
खुनाचा गुन्हा दाखल – शवविच्छदेनानंतर मृत श्रीमती वैशाली शेटे यांच्या डोक्यावर जखम आढळून आली तर शरीर काळे पडले असल्याचेही दिसून आले. तर घरातील एकूणच परिस्थिती, त्यांचा आढळून आलेला मृतदेह, त्यांच्या घराच्या मागील दरवाजाला बाहेरून लावलेली कडी यावरून पोलीसांनी त्यांचा खून झाला असावा असा निष्कर्ष काढला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) ‘अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
का आणि कशासाठी? – दरम्यान श्रीमती शेट्ये यांच्या अंगावरील दागिन्यांसह घरातील अन्य मौल्यवान वस्तु आहेत तशाच आहेत. त्यामुळे हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचा अद्याप उलगडा झालेला नाही. या प्रकरणी पोलीसांकडून वेगवेगळया बाजुंनी पडताळणी केली जात असून खुनाचा तपास केला जात आहे. मात्र अद्याप कोणतेही धागेदोरे पोलीसांच्या हाती न लागल्याने या खूनाच्या तपासाचे आव्हान पोलीसांपुढे रहाणार आहे. या प्रकरणी राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव तपास करत आहेत.

 
                                    