रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आलेले दोन पर्यटक समुद्रात बुडाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी खानापूर (ता. विटा, जि. सांगली) येथील २५ वर्षीय तरुणाला समुद्रात बुडताना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. शशांक धीरेंद्र कुलकर्णी असे वाचविण्यात आलेला या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, खानापूर येथील ६ तरुण मित्र देवदर्शन आणि पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते. सर्व जण समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. यातील शशांक कुलकर्णी हा समुद्राच्या खोल पाण्यात गेल्यानंतर अडकला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केल्याने समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांचे कर्मचारी आपल्या जेस्की बोटीने तत्काळ संबंधित तरुण बुडत असलेल्या दिशेने धावले. खोल पाण्यात बुडत असलेल्या शशांकला त्यांनी सुखरूपरीत्या पाण्याबाहेर आणले. मोरया वॉटर स्पोर्टचे कर्मचारी कैलास किशोर शितप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या धाडसाने शशांकचे प्राण वाचवले. त्यांना गणपतीपुळे ग्रामपंचायतचे जीवरक्षकांची मदत मि ळाली. या घटनेची माहिती मिळताच मालगुंड गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या पर्यटकांना समुद्राच्या धोकादायक स्थितीची माहिती देण्यात आली तसेच कोणीही खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणपतीपुळ्यात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविले…
खानापूर येथील ६ तरुण मित्र देवदर्शन आणि पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते.
RELATED ARTICLES

