पावस-रत्नागिरी मार्गावर फणसोप हायस्कूलच्या मागील बायपास रोडवर अचानक कुत्रे आडवे आल्याने दुचाकी सरंक्षक भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. जयप्रकाश चंद्रिका यादव (वय ५३) व ओमप्रकाश चंद्रिका यादव (वय ५१, दोघेही मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. फणसोप सडा-साईनगर, रत्नागिरी) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. संभाजी हुलगे जखमी झाले. ही घटना रविवारी (ता. १) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जयप्रकाश चंद्रिका यादव दुचाकी (एमएच ०८ बीजे३८५६) वरून ओमप्रकाश यादव आणि संभाजी हुलगे यांना घेऊन पावसकडून रत्नागिरीच्या दिशेने जात होते. फणसोप बायपास रोडवर अचानक रस्त्यात कुत्रे आडवे आले.
कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात जयप्रकाश यादव यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या चिरेबंदी दगडांवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, ओमप्रकाश यादव जागीच ठार झाले. तर गंभीर जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता जयप्रकाश यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जखमी संभाजी बंकट हुलगे (वय २१, रा. लातूर, सध्या रा. फणसोप सडा) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरून पोलिसांनी संशयित चालक जयप्रकाश यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

