रत्नागिरी: डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि वेग आणण्याच्या शर्यतीत रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात बाजी मारली आहे. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या ‘इन्युमरेशन फॉर्म’च्या (Enumeration Form) १०० टक्के डिजिटायझेशनच्या कामात रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या मोहिमेत अहोरात्र मेहनत घेत काम वेळेत पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (BLO) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला आहे.
राज्यातील ‘टॉप ३०’ मध्ये रत्नागिरीच्या ४ मतदारसंघांची झेप या मोहिमेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेने इतके अचूक आणि गतीने काम केले की, संपूर्ण महाराष्ट्रातील पहिल्या ३० सर्वोत्तम मतदारसंघांमध्ये एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल चार मतदारसंघांनी आपले स्थान पक्के केले आहे. यामध्ये खालील मतदारसंघांचा समावेश आहे:
-
दापोली मतदारसंघ: संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ६ व्या क्रमांकावर राहण्याचा मान मिळवला.
-
चिपळूण मतदारसंघ: संपूर्ण राज्यात ९ व्या क्रमांकावर झेप घेतली.
-
गुहागर मतदारसंघ: राज्यात १९ व्या क्रमांकावर स्थान पटकावले.
-
राजापूर मतदारसंघ: राज्यात २७ व्या क्रमांकावर राहून उल्लेखनीय कामगिरी केली.
‘टेरव बुद्रुक’ गावाने रचला इतिहास! या संपूर्ण मोहिमेत चिपळूण तालुक्यातील ‘टेरव बुद्रुक’ या छोट्याशा गावाने डिजिटल तंत्रज्ञानाचा इतका प्रभावी आणि अचूक वापर केला की, गावाने आपल्या डिजिटायझेशनचे काम १०० टक्के पूर्ण केले. असा ऐतिहासिक बहुमान मिळवणारे ‘टेरव बुद्रुक’ हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे. या यशामुळे गावाचे नाव आता राज्य पातळीवर अभिमानाने घेतले जात आहे.
कर्तव्यदक्ष ‘बीएलओ’चा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान जिल्ह्यात सर्वात आधी आणि अत्यंत अचूकपणे १०० टक्के डिजिटायझेशनचे काम पूर्ण करणाऱ्या उत्कृष्ट बीएलओ (BLO) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रशस्तीपत्रक देऊन गौरविले. सन्मानित झालेल्या अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे:
१. आरती अमित घस्ते (बीएलओ – चिपळूण मतदारसंघ, यादी भाग क्रमांक ३११, कोंडभुजबळ). २. सुप्रिया किसन लोखंडे (बीएलओ) आणि त्यांच्या सहकारी अंगणवाडी ताई मधुरा विश्वनाथ साळवी (चिपळूण मतदारसंघ, यादी भाग क्रमांक ११०, टेरव बुद्रुक). ३. चेतन कुंडलिक मेहेर (बीएलओ) आणि त्यांच्या पर्यवेक्षक सीमा धुळप (रत्नागिरी मतदारसंघ, यादी भाग क्रमांक ४३, खालगाव).
या शानदार सोहळ्याला उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आणि नायब तहसीलदार दीपक चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य मेळ घालत निवडणूक विभागाचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

