दापोली (रत्नागिरी): दीर्घकाळापासून सुरू असलेल्या शारीरिक व्याधी आणि सततच्या आजारपणाला कंटाळून दापोलीतील एका ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दापोली नगरपंचायत हद्दीतील बौद्धवाडी येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विश्वजित विश्वनाथ कासारे (वय ४० वर्षे, रा. बौद्धवाडी, दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
नेमकी काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजित कासारे हे गेल्या काही काळापासून सततच्या आजारपणाने त्रस्त होते. वारंवार होणाऱ्या शारीरिक त्रासामुळे ते मानसिकदृष्ट्याही खचले होते. १८ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातील इतर कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेर गेले होते.
घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्यांनी बेडरूममधील छताच्या लोखंडी बारला कापडी ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. काही वेळाने कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. समोरचे दृश्य पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृत विश्वजित यांचे मेहुणे प्रवीण जनार्दन तांबे (वय ४८ वर्षे, रा. बौद्धवाडी, दापोली) यांनी तातडीने दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
प्रवीण तांबे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दापोली पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची (Accidental Death) नोंद केली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.

