HomeRatnagiriगणपतीपुळे मंदिरात ऋग्वेदी उत्सर्जन व उपाकर्म विधी उत्साहात; वेदघोषाने दुमदुमले मंदिर

गणपतीपुळे मंदिरात ऋग्वेदी उत्सर्जन व उपाकर्म विधी उत्साहात; वेदघोषाने दुमदुमले मंदिर

तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे स्थानिक ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत शास्त्रोक्त श्रावणी अनुष्ठान संपन्न

रत्नागिरी / गणपतीपुळे: कोकणातील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरामध्ये ऋग्वेदी उत्सर्जन आणि उपाकर्म (श्रावणी) विधी अतिशय भावपूर्ण, मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

‘श्रीं’च्या मुख्य मंदिराच्या भव्य सभागृहात समस्त गणपतीपुळे ब्रह्मवृंदाच्या वतीने सकाळी ८ ते ११ या वेळेत हे धार्मिक अनुष्ठान पार पडले. यावेळी उपस्थित पुरोहितांच्या लयबद्ध आणि स्पष्ट वेदघोषाने मंदिराचा संपूर्ण परिसर भारवून गेला होता.

शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला श्रावणी विधी

सनातन हिंदू धर्मसंस्कृतीतील परंपरेनुसार ऋग्वेदी शाखेचा श्रावणी प्रयोग विधी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि प्रसन्न वातावरणात पूर्ण करण्यात आला. हिंदू परंपरेत श्रावणी विधीला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. वर्षभरात दैनंदिन नित्यकर्मे आचरताना घडलेल्या नकळत त्रुटींचे प्रायश्चित्त घेणे आणि आगामी वर्षात नव्या उत्साहाने वेदाध्ययन व ज्ञानसाधनेचा संकल्प करणे, या उद्देशाने हा श्रावणी विधी संपन्न होतो.

स्थानिक ब्रह्मवृंदाचा उत्स्फूर्त सहभाग

या धार्मिक सोहळ्यामध्ये गणपतीपुळे परिसरातील सर्व प्रमुख पुरोहित, शास्त्री आणि ब्रह्मवृंद पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या समृद्ध वैदिक परंपरेचे जतन आणि संवर्धन व्हावे, यासाठी गणपतीपुळे येथे दरवर्षी अशा धार्मिक व पारंपरिक विधींचे अत्यंत काटेकोरपणे आयोजन केले जाते.

RELATED ARTICLES

Most Popular