HomeRatnagiriदापोली: फणस नाक्यावर ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण; कटरचा धाक दाखवून दिली...

दापोली: फणस नाक्यावर ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण; कटरचा धाक दाखवून दिली धमकी

प्रवासी भरण्याच्या वादातून दापोलीत भरदिवसा ट्रॅव्हल्स चालकावर प्राणघातक हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली: प्रवाशांची वाहतूक करण्याच्या क्षुल्लक व्यावसायिक वादातून एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण करत कटर ब्लेडचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार दापोली तालुक्यातील फणस नाका येथे घडला आहे. भरदिवसा घडलेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवाशांना सोडून विश्रांतीसाठी जाताना घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश दत्ताराम शिगवण (वय ३६, रा. मगीज मांडवकरवाडी, दापोली) हे स्वतःची टेम्पो ट्रॅव्हल्स चालवून व्यवसाय करतात. २० ऑगस्ट रोजी सकाळी ते मुंबईहून प्रवासी घेऊन दापोली येथे आले होते. प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी सुखरूप उतरवल्यानंतर सतीश शिगवण हे विश्रांती घेण्यासाठी उमरवरे येथील त्यांचे मित्र प्रभाकर वानकर यांच्या घराकडे जाण्यास निघाले.

सकाळी पावणेबाराच्या सुमारास त्यांनी आपली गाडी फणस नाका येथे रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. नेमक्या याच वेळी तेथे रवी किरण उके (रा. फणस, दापोली) हा दुसरा ट्रॅव्हल्स व्यावसायिक आला. त्याने शिगवण यांच्याशी जुन्या व्यावसायिक वादातून वाद घालण्यास सुरुवात केली. “या भागात प्रवासी भरायचे नाहीत आणि वाकवली गावाच्या पुढे गाडी घेऊन यायचे नाही,” अशी दमबाजी करत उके याने शिगवण यांच्याशी विनाकारण हुज्जत घातली.

बांबूने जबर मारहाण आणि कटर ब्लेडचा धाक

“तू माझ्याशी उगाच वाद घालू नकोस,” असे शिगवण यांनी सांगताच रवी उके याचा पारा चढला. संतापाच्या भरात त्याने हातातील बांबूने सतीश शिगवण यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. दोन्ही पाय, कंबर, मांडी, पोटरी, हात आणि थेट डोक्यावर बांबूचे जोरदार फटके मारल्यामुळे शिगवण रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले. मारहाण केल्यानंतरही आरोपी थांबला नाही; त्याने स्वतःजवळील कटर ब्लेड काढून शिगवण यांच्या दिशेने धावून जात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

दापोली पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेनंतर जखमी सतीश शिगवण यांनी थेट दापोली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत संशयित आरोपी रवी किरण उके याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम ११७(२), ३५१(२), ३५२, आणि १३१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular