खेड / रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाटात सोमवारी (२८ सप्टेंबर) दुपारी एक थरारक घटना घडली. अलिबागहून रत्नागिरीच्या दिशेने ओल्या मासळीची वाहतूक करणारा एक भलामोठा कंटेनर अचानक अनियंत्रित होऊन धामणदेवी गावाजवळ पलटी झाला. अपघातानंतर काही वेळातच कंटेनरच्या डिझेल टँकमधून धुराचे प्रचंड लोट उठू लागल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली आणि मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली होती.
असा घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथून ‘तारली’ प्रकारची ताजी मासळी भरून निघालेला कंटेनर (क्रमांक: MH-04-JK-0381) कशेडी घाटातून जात होता. दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास धामणदेवी गावालगतच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कंटेनर रस्त्यावरच कलंडला. कंटेनर पलटी होताच आतमध्ये भरलेली मासळी रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरली.
अपघात एवढा गंभीर होता की, काही क्षणांत कंटेनरच्या डिझेल टँकजवळून अचानक तीव्र धूर निघू लागला. यामुळे गाडीने पेट घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. संभाव्य स्फोट किंवा मोठी आग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तात्काळ महामार्गावरील सुमारे दीड किलोमीटर अंतराची वाहतूक एका बाजूने (एकेरी) वळवून सुरक्षित अंतर ठेवले.
पोलीस आणि यंत्रणांचे तातडीने मदतकार्य
अपघाताची बातमी मिळताच स्थानिक पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस अंमलदार जयश्री सरणेकर, सुतार, सौरभ जाधव, बीट मार्शल रामेश्वर साळुंखे तसेच दामिनी पथकातील शीतल बनसोडे व केतकी सकपाळ यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली.
कंटेनरचा चालक या अपघातात जखमी झाला असून पोलिसांनी त्याला रुग्णवाहिकेतून तातडीने पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ
डिझेल टँक पेट घेण्याच्या बेतात असतानाच महाड एमआयडीसी (MIDC) अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. सब-ऑफिसर चव्हाण, सुरेंद्र मोरे, विशाल म्हात्रे, विजय साठे आणि प्रवीण चिंचोले यांच्या पथकाने तत्परतेने डिझेल टँक आणि इंजिनच्या भागावर जोरदार पाण्याचा मारा सुरू केला. अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे धूर शमवण्यात यश आले आणि संभाव्य मोठा स्फोट टळला.
यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर मुख्य रस्त्यावरून बाजूला करून महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

