HomeRatnagiriरत्नागिरी: कुर्धे येथील चक्रीवादळ निवारा केंद्राचे रखडलेले काम अखेर पुन्हा सुरू!

रत्नागिरी: कुर्धे येथील चक्रीवादळ निवारा केंद्राचे रखडलेले काम अखेर पुन्हा सुरू!

पावस परिसरातील आपत्ती सौमीकरण प्रकल्पाला वेग; पहिल्या स्लॅबसाठी युद्धपातळीवर सेंट्रिंगचे काम सुरू

रत्नागिरी: अरबी समुद्राच्या लहरी हवामानाचा आणि वारंवार धडकणाऱ्या चक्रीवादळांचा फटका बसणाऱ्या कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसराजवळील कुर्धे सडा येथे उभारण्यात येत असलेल्या ‘कोकण आपत्ती सौमीकरण चक्रीवादळ केंद्राच्या’ बहुउद्देशीय इमारतीचे गेल्या काही काळापासून ठप्प पडलेले बांधकाम अखेर पुन्हा एकदा पूर्ण जोमाने सुरू झाले आहे.

सध्या या ठिकाणी इमारतीचा पहिला स्लॅब टाकण्यासाठी सेंट्रिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

२५ गुंठ्यांचा विस्तीर्ण परिसर आणि कामाचा प्रवास

नैसर्गिक आपत्तीच्या काळात स्थानिक नागरिकांना तातडीने सुरक्षित आसरा मिळावा, यासाठी कुर्धे येथील मोकळ्या कातळ सड्यावर तब्बल २५ गुंठे जागा या अद्ययावत चक्रीवादळ केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रकल्पाच्या सुरुवातीला इमारतीचा पाया (फाउंडेशन) उभारण्याचे काम अतिशय वेगाने पूर्ण करण्यात आले.

मात्र, पायाभरणी पूर्ण झाल्यानंतर अज्ञात कारणांमुळे हे बांधकाम अचानक थांबले. अनेक महिने काम रखडल्यामुळे पावसाळा किंवा चक्रीवादळासारख्या संकटात हक्काचा निवारा मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. नागरिकांनी हे काम तात्काळ सुरू करण्याची वारंवार मागणी लावून धरली होती.

पहिल्या मजल्याच्या स्लॅबची तयारी अंतिम टप्प्यात

स्थानिकांच्या रेट्यानंतर प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने कामाची सूत्रे पुन्हा हाती घेतली आहेत. सद्यस्थितीत इमारतीच्या भिंतींचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात असून, पहिल्या स्लॅबसाठी लागणारे लाकडी व लोखंडी सेंट्रिंगचे काम वेगाने केले जात आहे.

बांधकामाच्या ठिकाणी मजुरांची लगबग पाहायला मिळत असून येत्या काही दिवसांत पहिला स्लॅब भरण्यात येणार आहे. हे केंद्र पूर्णत्वास आल्यानंतर चक्रीवादळ, मुसळधार पाऊस किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कुर्धे व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना अन्न, पाणी आणि सुरक्षित निवारा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular