HomeDapoliदापोलीत खोके हटाव मोहीम अर्ध्यावरच? नगरपंचायतीच्या नरमाईच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्न

दापोलीत खोके हटाव मोहीम अर्ध्यावरच? नगरपंचायतीच्या नरमाईच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्न

५ ऑक्टोबरच्या धडक कारवाईनंतर प्रशासनाचा वेग मंदावला; बाजारपेठ व पोलीस गल्लीतील अतिक्रमणे अद्याप कायम.

दापोली : काही दिवसांपूर्वी दापोलीच्या रस्त्यांवर धडधडणारे जेसीबी, प्रशासनाचा आक्रमक पवित्रा आणि रस्त्यावरील बेकायदेशीर टपऱ्यांवर पडलेला हातोडा… हे सर्व पाहून दापोलीकरांना वाटले होते की शहर आता कायमचे अतिक्रमणमुक्त होणार. ५ ऑक्टोबर रोजी नगरपंचायतीने ज्या धडाक्यात मोहीम राबवून कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई केली, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, सुरुवातीला दाखवलेला हा आक्रमक बाणा आता अचानक थंडावल्याचे स्पष्ट दिसत असून, नगरपंचायतीच्या या ‘बॅकफूट’ भूमिकेमुळे दापोलीकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सुरुवातीला धडक कारवाई, मग आता नरमाई का?

५ ऑक्टोबरच्या धडक मोहिमेदरम्यान नगरपंचायतीने दापोली शहरातील सुमारे ९० बेकायदेशीर खोके आणि २४ मटण-चिकन विक्रेत्यांच्या टपऱ्या हटवून मोठा संदेश दिला होता. वर्षानुवर्षे पदपथ आणि रस्ते अडवून बसलेल्या या अतिक्रमणांवर कारवाई झाल्याने शहराने मोकळा श्वास घेतला होता. नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी महेश धुमाळ यांच्या या धडक पावलाचे नागरिकांकडून तोंडभरून कौतुकही झाले.

परंतु, सुरुवातीचा हा धडाका केवळ औटघटकेचाच ठरला की काय, अशी शंका आता उपस्थित होत आहे. कारण या पहिल्या टप्प्यानंतर उर्वरित शहरातील बेकायदेशीर खोक्यांवर होणारी संभाव्य कारवाई पूर्णपणे थंडावली आहे.

पोलीस गल्लीसह मुख्य बाजारपेठेतील टपऱ्या ‘जैसे थे’

शहरातील सर्वाधिक गर्दीच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पोलीस गल्ली तसेच मुख्य बाजारपेठेतील अनेक बेकायदेशीर टपऱ्या आजही रस्त्यांवर ठामपणे उभ्या आहेत. या भागातील कारवाई कधी होणार, याबाबत मुख्याधिकारी महेश धुमाळ यांना विचारले असता त्यांनी, “कारवाई निश्चित होईल; मात्र ती नेमकी कधी होईल, हे सध्या सांगता येणार नाही. उर्वरित खोक्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाईल,” अशी प्रतिक्रिया दिली. प्रशासनाची ही ‘टप्प्याटप्प्याने कारवाई’ करण्याची भाषा म्हणजे कारवाई थंड बस्त्यात टाकण्याचा प्रकार तर नाही ना, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.

केवळ २५ टक्केच कारवाई; ७५ टक्के काम अजूनही शिल्लक

स्थानिक नागरिकांच्या आणि जाणकारांच्या मते, आतापर्यंत झालेली कारवाई ही आवश्यक कारवाईच्या केवळ २५ टक्के इतकीच आहे. अजूनही सुमारे ७५ टक्के अतिक्रमणे शहरात कायम आहेत. जर सुरुवातीला सर्वच अतिक्रमणांवर सरसकट आणि कठोर कारवाईचे संकेत दिले होते, तर मग आता अचानक भूमिका बदलून ‘टप्प्याटप्प्याने कारवाई’चे धोरण का अवलंबले गेले? कोणाच्या दबावामुळे प्रशासनाचे हात आखडले आहेत का? असे अनेक प्रश्न आता दापोलीतील करदाते नागरिक थेट विचारत आहेत.

सध्या तरी या खोके हटाव मोहिमेचा वेग मंदावला असला, तरी दापोलीकर याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आगामी काळात दापोलीच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा नगरपंचायतीच्या पिवळ्या जेसीबीचा धडाका पाहायला मिळणार की ही मोहीमही नेहमीप्रमाणे कागदावरच शांत होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

RELATED ARTICLES

Most Popular