कोकणच्या किनारपट्टीसाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले लाडघर आणि गुहागर हे दोन्ही समुद्रकिनारे २०२६-२७ या हंगामासाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag) प्रमाणपत्राने संमत झाले आहेत. या जागतिक दर्जाच्या सन्मानामुळे महाराष्ट्राच्या आणि विशेषतः कोकणाच्या पर्यटन विश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कठोर निकषांवर खरी उतरली कोकणची किनारपट्टी
डेन्मार्कस्थित जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित ‘फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन’ (FEE) या संस्थेमार्फत जगातील अत्यंत स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांना हे मानांकन प्रदान केले जाते. यासाठी किनाऱ्याची स्वच्छता, पाण्याचा उच्च दर्जा, किनारपट्टीवरील पर्यावरण संवर्धन, सागरी जैवविविधतेचे रक्षण, पर्यटकांची सुरक्षा आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन यांसारख्या अत्यंत कडक आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता करणे अनिवार्य असते. लाडघर आणि गुहागर या दोन्ही किनाऱ्यांनी या सर्व निकषांवर यशस्वीपणे आपली मोहर उमटवली आहे.
राज्य शासन, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिकांच्या एकत्रित व समन्वित प्रयत्नांमुळेच हे यश साध्य झाले आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे. याप्रसंगी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे आणि जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पर्यटनाला आणि स्थानिक रोजगाराला मिळणार मोठी चालना
‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळाल्यामुळे लाडघर आणि गुहागर किनारे आता अधिकृतपणे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार आहेत. परिणामी, भविष्यात येथे येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या नव्या, सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत. कोकणातील समृद्ध सागरी पर्यावरणाचे जतन करत शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

