दिवाळीचा सण, सुट्ट्यांचा आनंद आणि कोकणात फिरण्यासाठी आलेली पर्यटकांची तुफान गर्दी… या उत्साही वातावरणात रत्नागिरी जिल्ह्यात मात्र एक मोठी समस्या ऐन तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजीचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. गॅस भरण्यासाठी वाहनचालकांना चक्क दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.
पर्यटकांची वाढती गर्दी अन् नियोजनाचा अभाव
दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि गणपतीपुळे यांसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर चारचाकी वाहने आणि मिनीबसची मोठी गर्दी झाली आहे. मात्र, या प्रचंड वाढत्या मागणीच्या तुलनेत गॅसचा मुबलक साठा उपलब्ध न झाल्याने हा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन पर्यटन हंगामात प्रशासनाकडून किंवा पंप चालकांकडून योग्य नियोजन झाले नसल्याचे यामुळे स्पष्ट होते.
कुठे आहेत सर्वाधिक हाल?
रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील पंपांवर सध्या वाहनचालकांची प्रचंड धावपळ उडाली आहे.
-
प्रमुख ठिकाणे: रत्नागिरी शहरातील माळनाका, एमआयडीसी (जे.के. फाईल्स), हातखंबा, नाचणे, तसेच चिपळूण, खेड (एमजीएल), लांजा आणि पाली येथील सीएनजी पंपांवर हाणामारीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
-
अनेक पंपांवर अवघ्या काही वेळातच ‘सीएनजी संपले’ चे फलक झळकत असल्याने तासन्तास रांगेत ताटकळत उभा राहिलेला वाहनचालक निराश होत आहे. गॅसची नवीन गाडी कधी येणार, याची प्रतीक्षा करत अनेक जण पंपावरच तासनतास गाड्या थांबवून राहत आहेत.
रिक्षाचालक आणि नोकरदारांना मोठा फटका
या इंधनटंचाईचा सर्वात मोठा आर्थिक आणि मानसिक फटका स्थानिक रिक्षाचालकांना व नोकरदारांना बसत आहे. प्रवासी वाहतूक करून दोन पैसे कमवण्याच्या वेळेत रिक्षाचालकांना दिवसभर गॅसच्या रांगेतच ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेतच, शिवाय रिक्षाचालकांच्या उत्पन्नावरही गदा आली आहे.
वाहनचालकांचा संताप
या संपूर्ण परिस्थितीबाबत वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. चारचाकी चालक किरण राठोड यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, “सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बाहेरून आलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमुळे मोठी गर्दी आहे. मात्र, पंपांवर कधी गॅस मिळतो तर कधी मिळतच नाही. सीएनजी भरण्यासाठी तब्बल दोन-दोन तास रांगेत उभे राहावे लागत असून आमचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. प्रशासनाने आणि पंप चालकांनी यावर तात्काळ ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.”

