HomeChiplunविहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या पिल्लाला जीवदान; वनविभागाचे उदय सामंत यांच्याकडून कौतुक

विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या पिल्लाला जीवदान; वनविभागाचे उदय सामंत यांच्याकडून कौतुक

चिपळूणमधील ४० फूट खोल विहिरीतून ब्लॅक पॅंथरच्या पिल्लाची सुखरूप सुटका; महिला वनाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक

रत्नागिरी / चिपळूण: कोकणातील निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा वन्यजीव प्रेमींसाठी आणि निसर्गासाठी दिलासादायक घटना घडली आहे. चिपळूण तालुक्यातील उमरोली येथील भडवळकरवाडी परिसरात तब्बल ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या अत्यंत दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या (ब्लॅक पॅंथर) पिल्लाला वनविभागाच्या बचाव पथकाने मोठ्या शिताफीने आणि सुखरूप बाहेर काढत नवीन जीवन दिले आहे. या धाडसी बचाव मोहिमेनंतर राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण येथील वनविभागाच्या कार्यालयाला भेट देऊन संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले.

काळा बिबट्या हा निसर्गातील एक अत्यंत दुर्मीळ वन्यप्राणी मानला जातो आणि त्याचे अस्तित्व मोजक्याच भागांत पाहायला मिळते. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारे ब्लॅक पॅंथर आढळण्याची आणि वनविभागाने त्याला सुरक्षितपणे वाचवण्याची ही दुसरी मोठी घटना ठरली आहे. या कामगिरीतून वनविभागाच्या रेस्क्यू टीमची तत्परता आणि सज्जता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

या यशस्वी मोहिमेनंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी वनविभागाच्या कार्यक्षमतेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “ब्लॅक पॅंथर अत्यंत दुर्मीळ असून त्याचे दर्शन फार कमी ठिकाणी घडते. गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात अशी दुसरी घटना घडली असून वनविभागाने दोन्ही वेळा यशस्वी सुटका केली आहे. यावरून जिल्ह्याची रेस्क्यू टीम संपूर्ण महाराष्ट्रात ‘नंबर वन’ असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.”

यावेळी जिल्ह्यातील महिला वनाधिकाऱ्यांच्या धाडसी नेतृत्वाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. “आमच्या जिल्ह्याच्या दोन्ही प्रमुख वनाधिकारी महिला आहेत. आक्रमक स्वभावाच्या वन्यप्राण्यांनाही अत्यंत सक्षमपणे, धैर्याने आणि कौशल्याने हाताळून त्या रेस्क्यू करतात, ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानास्पद बाब आहे. त्यांचे शंभर टक्के कौतुक केलेच पाहिजे,” असे डॉ. सामंत यांनी नमूद केले.

या संपूर्ण बचाव मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हा वन्यप्राणी स्वभावतः आक्रमक असूनही त्याने कोणत्याही नागरिकाला किंवा वनविभागाच्या कर्मचाऱ्याला कोणतीही इजा पोहोचवली नाही. तसेच वनविभागाच्या पथकानेही पिल्लाला कोणतीही हानी न पोहोचवता अत्यंत संवेदनशीलतेने सुरक्षित बाहेर काढले. याबद्दल पालकमंत्र्यांनी संपूर्ण बचाव पथकाचे आभार मानले. या प्रसंगी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई आणि सहायक वन अधिकारी प्रियांका लगड आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या पिल्लाला सुखरूप बाहेर काढल्याची बातमी समजताच परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. या दुर्मीळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांमध्ये कुतूहल पाहायला मिळाले, तर वनविभागाच्या तत्परतेबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular