रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथे केवळ उधारीचे पैसे मागितल्याच्या किरकोळ वाटणाऱ्या कारणावरून एका किराणा दुकानमालकावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (दि. १६) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास खेडशी येथील ‘सरस्वती सुपर मार्केट’ या दुकानात घडली. दुकानमालक भीमसिंह भवरसिंह पुरोहित (वय ४२, रा. खेडशी नाका, कारवांचीवाडी) यांच्या दुकानात संशयित रमेश चंद्रकांत खेत्री (वय ३८, रा. खेडशी-कारवांचीवाडी) हा किराणा सामान खरेदी करण्यासाठी आला होता.
सामान घेतल्यानंतर भीमसिंह पुरोहित यांनी रमेश खेत्रीकडे त्या खरेदीचे पैसे तसेच आधीची थकीत उधारी देण्याची मागणी केली. या पैशांच्या तगाद्यामुळे रमेश खेत्री संतापला आणि त्याने दुकानमालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बघता बघता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात संशयिताने लोखंडी सळईने भीमसिंह यांच्या खांद्यावर मारहाण केली. प्रकरण इथेच न थांबता, त्याने दुकानाबाहेर पडलेला चिरा उचलून थेट भीमसिंह यांच्या डोक्यात मारला. या अचानक झालेल्या हल्ल्यात भीमसिंह पुरोहित गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर जखमी दुकानमालक भीमसिंह पुरोहित यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित रमेश खेत्री विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

