रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरून सुरू असलेल्या अवैध मद्य वाहतुकीवर रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जोरदार धडक कारवाई केली आहे. गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी हातखंबा परिसरात रचलेल्या सापळ्यात गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा वाहतूक करणारा एक सहाचाकी ट्रक पकडण्यात आला. या कारवाईत तब्बल १ कोटी ७५ लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका चालकाला अटक करण्यात आली आहे.
हॉटेल सदानंदसमोर पथकाचा सापळा गोव्याहून मुंबईच्या दिशेने एका वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील हातखंबा (ता. जि. रत्नागिरी) येथील हॉटेल सदानंदसमोर पाळत ठेवून सापळा रचला. गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या सहाचाकी अशोक लेलंड ट्रकची (क्र. एमएच ११ डीव्ही ७९१४) संशयाच्या आधारे थांबवून तपासणी करण्यात आली. या तपासणीत केवळ गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेला आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला दारूसाठा आढळून आला.
१,४०० बॉक्स जप्त; साताऱ्याचा चालक ताब्यात जप्त केलेल्या साठ्यामध्ये ‘रॉयल ब्लू व्हिस्की’ या ब्रँडचे तब्बल १,४०० बॉक्स (एकूण १२,०९६ बल्क लिटर) असून, त्याची किंमत १ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये इतकी आहे. ही दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेला सहाचाकी ट्रक असा एकूण १,७५,९४,००० रुपयांचा मुद्देमाल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी ट्रकचालक सचिन भीमराव सपकाळ (रा. शिवघर, बौद्धवस्ती, ता. जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (अ, ई), ८१, ८३ आणि ९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात यशस्वी मोहीम ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, अंमलबजावणी व दक्षता संचालक प्रसाद सुर्वे, कोल्हापूर विभागाच्या उपायुक्त स्नेहलता नरवणे आणि रत्नागिरीच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक पी. ए. गुरव तसेच जवान मानस पवार, अतुल वसावे, अनुराग बर्वे, विशाल विचारे, विशाल भोसले, निलेश तुपे आणि सागर टिकार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर करत आहेत.
नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही हातभट्टी दारूची निर्मिती किंवा विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक-साठवणूक अथवा बनावट माडी विक्री सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ विभागाच्या ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा १८००२३३९९९९ या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

