HomeRatnagiriहातखंबा उतारावर गॅस टँकरचा अपघात; निष्काळजी चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा

हातखंबा उतारावर गॅस टँकरचा अपघात; निष्काळजी चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा

ज्वालाग्राही पदार्थाची वाहतूक करताना भरधाव वेगामुळे अपघात; नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका

रत्नागिरी तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या हातखंबा परिसरात सोमवारी (२३ नोव्हेंबर) दुपारी सुमारे पावणेतीनच्या वाजता एक मोठी दुर्घटना घडता-घडता टळली असली, तरी या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. हातखंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उतारावर ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणाऱ्या गॅस टँकरचा अपघात झाला. या प्रकरणी टँकरचालकाच्या निष्काळजीपणाबद्दल रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टँकर (क्र. एमएच ४३ वाय ५८१७) जीओ गॅस कंपनीचा असून तो ज्वालाग्राही पदार्थाने भरलेला होता. संबंधित चालक निवळी येथून कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान मुंबई-गोवा महामार्गालगतच्या हातखंबा उतारावरून टँकर खाली येत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला किंवा अत्यंत भरधाव वेगाने आणि बेफिकीरपणे गाडी चालवल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका

गॅस टँकरमध्ये अत्यंत ज्वालाग्राही आणि धोकादायक पदार्थ असल्याचे चालकास पूर्णपणे माहीत होते. असे असतानाही उताराच्या रस्त्यावर अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून चालकाने हातखंबा परिसरातील स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण केल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली, तरी धोकादायक मालाची वाहतूक करताना दाखवलेला हा हलगर्जीपणा गंभीर मानला जात आहे.

पोलीस पाटलांच्या तक्रारीवरून कारवाई

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हातखंबा येथील पोलीस पाटील शर्वरी सनगरे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे संशयित चालक जबराव रंगराव देशमुख (वय ४९, रा. कळंबेश्वर, ता. मेहकर, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपघातामागील नेमकी कारणे काय होती, वाहनाचा वेग किती होता आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते की नाही, याचा सखोल तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular